सातारा : साताऱ्यात आयटी पार्क व्हावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर राज्य सरकारने साताऱ्यात आयटी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्या दृष्टीने काही दिवसापूर्वीच लिंबखिंड, नागेवाडी ता. सातारा येथे प्रस्तावीत आयटी पार्क जागेचा ड्रोन सर्व्हे एमआयडीसी सातारा विभागामार्फत करण्यात आला होता.
त्यानंतर लिंबखिंड परिसरातील या शासकीय जागेच्या क्षेत्राचा सर्व्हे करण्यात आला होता. आता त्या ठिकाणी फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रामुख्याने रस्ते, पाणी हे सर्व झाल्यानंतर आयटीशी संबंधित उद्योजक या सातारच्या आयटी पार्ककडे नक्की येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सातारची प्रगती आयटी पार्क क्षेत्राच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या आयटीपार्क बरोबर यामध्ये कन्व्हेन्शन सेंटर सुद्धा याठिकाणी होणार आहे. सातारकरांना या कन्व्हेन्शन सेंटरचा मोठा फायदा होणार आहे. त्या दृष्टीने रविवारी सकाळी लिंबखिंड येथे एमआयडीसी विभागाच्या वतीने क्रेनच्या सहाय्याने भला मोठा फलक लावण्यात आला आहे. त्यावर प्रामुख्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तावित माहिती तंत्रज्ञान उद्यान नागेवाडी (ता. सातारा) असा उल्लेख करण्यात आला आहे. या फलकाने स्थानिकांच्या आशा उंचावल्या आहेत. भविष्यात सातारा जिल्ह्यातील आयटीशी संबंधित शिक्षित युवकांना आता नोकरीसाठी नवे दालन खुले होण्याची आस लागून राहिली आहे.