नागपूर : सातबारा उताऱ्यावरील नव्या नियमांनुसार सामायिक शेतीच्या जमिनीची मोजणी करून प्रत्येकाचा हिस्सा निश्चित केल्याशिवाय जमिनीची नोंदणी करता येणार नाही. या निर्णयामुळे जमिनीच्या हिश्शांवरून निर्माण होणारे वाद टाळता येतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. याअगोदर एका सातबारा उताऱ्यावर चार व्यक्तींची नावे असतानाही त्यातील एखादी व्यक्ती जमिनीची विक्री करू शकत होती. मात्र, विक्रीनंतर प्रत्यक्ष जमिनीवर गेल्यावर कोणाच्या वाट्याला कोणता भाग आला, यावरून वाद निर्माण होत होते. त्यामुळे न्यायालयात खटले दाखल होत होते आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले होते. हे वाद टाळण्यासाठी आता सामायिक शेतीच्या जमिनीची मोजणी करून प्रत्येकाचा हिस्सा वेगळा केल्याशिवाय विक्री करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाबाबत विचारले असता बावनकुळे यांनी, दिवाळी आली की फटाके फुटतात. त्यामुळे दिवाळीचा एक फटाका फुटला, या शब्दांत चिमटा काढला.
तक्रार आल्यास मनोज जरांगे यांच्या आरोपांची चौकशी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपींसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित व्यक्तीने सरकारकडे तक्रार केली, तर तिची चौकशी करण्यात येईल. जरांगे यांना जे बोलायचे आहे, ते बोलण्यास ते स्वतंत्र आहेत. त्यांनी सरकारकडे तक्रार केली असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा संबंधित यंत्रणा तिची चौकशी करतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
संजय राऊत यांची विधाने संविधानविरोधी
अल्बेनियातील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीला आग लागल्याच्या घटनेच्या संदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बावनकुळे यांनी टीका केली. अशा घटनांमधून समाजाने शिकले पाहिजे, असे म्हणण्याचा नेमका अर्थ काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.भारतीय संविधानाने देशाला मजबूत लोकशाही व्यवस्था दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देशाचा कारभार चालतो. परदेशातील अशा घटनांचा संदर्भ देऊन भारतातही असे घडावे, असा अर्थ निघणारी विधाने करणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. भारताचे संविधान मजबूत असून देशातील लोकशाही व्यवस्था सक्षम आहे. परदेशात घडणाऱ्या घटनांची भारताशी तुलना करता येणार नाही. भारतीय जनता अशा घटनांना समर्थन देत नाही. कोणी चिथावणी देऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी भारतातील जनता अशा प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
सातबारा उताऱ्यावरील नव्या नियमांनुसार सामायिक जमिनीच्या मोजणीशिवाय नोंदणी होणारच नाही : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
by Team Satara Today | published on : 22 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा