सातारा : बहीण-भावाच्या नात्याची विण अधिक घट्ट कारणार्या रक्षाबंधनसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून छत्रपतींची राजमुद्रा, रुद्राक्ष अक्रॅलिक, नाजूक कलाकारी व रेशमी धाग्यांच्या राख्या लक्षवेधी ठरत आहेत. लाडक्या बहिणींकडून दूर गावी राहणार्या भावासाठी राखी खरेदी केली जात आहे. राख्यांचे असंख्य पर्याय उपलब्ध असल्याने महिलांकडून चोखंदळपणे भावासाठी राखी खरेदी केली जात आहे.
पारंपारिक सण समारंभांना आधुनिकतेची झालर लाभत असली तरी अद्यापही त्यातूनच संस्कृतीचे संस्कार जपले जात आहेत. बहिण भावाचे नात्याचे पावित्र्य आबाधित राखण्यासाठी रक्षाबंधनाचा सण सर्वत्रच उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी दि. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होत आहे. पंधरा दिवस बाकी असले तरी बाहेरगावी राहणार्या भावासाठी वेळेत राखी पोहचावी याचीदेखील बहिणींकडून खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली असून राख्यांची असंख्य व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. सातारा शहर व परिसरासह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये राख्यांची रेलचेल वाढली आहे.
यावर्षीही राख्यांमध्ये विविधता दिसत असून मोती, रुद्राक्ष, ओम पेंडल राखीसह रेशमी धाग्यांच्या कलाकारी केलेल्या राख्या तसेच श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा या राख्या विशेष लक्ष वेधत आहेत. तसेच उडाण राखी, कार्टून, जरदोशीवर्क, चिमुकल्यांसाठी लायटिंग राखी, चांदीचे वर्क असलेल्या राखी, चंदन राखी, मोती व वुडनच्या ब्रेसलेट राखी याबरोबरच पारंपारीक गोंडा, स्पंज राख्यांचेही असंख्य प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही बहिणींकडून भाऊरायांना रिटर्न गिफ्ट दिले जात असल्याने त्याचीही रेलचेल वाढली आहे.
हंगामी व्यावसायिकांनी ठिकठिकाणी राखीची दुकाने थाटली असून लाडक्या भावासाठी महिलांकडून चोखंदळपणे राखीची निवड करुन खरेदी केली जात आहे. दूरदेशी राहणार्या भावाच्या रक्षाबंधनसाठी पोस्ट कार्यालयाची विशेष राखी सेवा सुरु झाल्याने बहिण-भावाचा स्नेह आणखी वाढणार आहे.
आपल्या भावाला आपण स्वत: तयार केलेली राखी बांधने याचा आनंद काही वेगळाच असतो. तसेच सीमेवरील सैनिकांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसह शालेय विद्यार्थिनींकडूनही स्वत: तयार केलेल्या राख्या पाठवण्यात येतात. या पार्श्वभूमीवर शाळांसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राखी मेकींग कार्याशाळांचे आयोजन होवू लागले आहे.