पंतप्रधान मोदींच्या साधेपणाच्या आवाहनाला सातारा जिल्ह्यातील आमदार-खासदारांकडून हरताळ; 'व्हीआयपी' कल्चर मोडून काढण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देशवासीयांना इंधन बचतीचे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. स्वतःच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या डझनावरून कमी करून मोदींनी या मोहिमेची सुरुवात स्वतःपासून केली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करून देशहिताला प्राधान्य दिले आहे. मात्र, साताऱ्यात याच्या नेमकी उलटी आणि विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी मात्र सुरक्षिततेच्या नावाखाली पोलीस बळाचा आणि शासकीय यंत्रणेचा प्रचंड अपव्यय करताना दिसत आहेत.

​नुकतेच निवडून आलेले किंवा पराभूत झालेले आमदार-खासदार सध्या आपल्या मतदारसंघात तसेच मुंबई-पुण्यात आपली 'छाप' पाडण्यासाठी चार-पाच पोलीस बॉडीगार्ड आणि शासकीय गाड्यांचा ताफा घेऊन फिरताना दिसत आहेत. सातारा जिल्हा पोलीस दलात मुळातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांची दमछाक होत आहे. सातारा जिल्हा हा काही नक्षलग्रस्त भाग नाही. येथे सामान्य माणसाच्या जीवालाही धोका नसताना, जनतेतून निवडून आलेल्या या लोकप्रतिनिधींना नक्की कुणापासून धोका आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

​पूर्वीच्या काळात एका पोलीस बॉडीगार्डमध्ये लोकप्रतिनिधींचे काम व्यवस्थित चालत असे. मात्र, आता प्रत्येक आमदार-खासदाराला आधुनिक शस्त्रास्त्रांसह चार ते पाच पोलिसांचा ताफा कशासाठी लागतो, हे अनाकलनीय आहे. निवडणुकीत मतांचा जोगवा मागताना मतदारांच्या दारात नतमस्तक होणारे हेच लोकप्रतिनिधी आता 'व्हीआयपी कल्चर'मध्ये मश्गूल आहेत. एकीकडे सर्वसामान्यांना गॅस आणि पेट्रोलसाठी रांगा लावाव्या लागत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या या बडेजावामुळे सार्वजनिक निधीचा मोठा अपव्यय होत आहे.

​जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. गरज नसताना सुरक्षेचा विळखा घालून फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पोलीस बंदोबस्तात तातडीने कपात करावी आणि त्यांच्या ताफ्यातील अनावश्यक 'पायलट' वाहनेही ताब्यात घ्यावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे.  

सातारा जिल्ह्यातील आमदार खासदारांना विनाकारण देण्यात आलेल्या सुरक्षे संबंधात सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी यु बाबतीमध्ये पुढाकार घेऊन विनाकारण देण्यात देण्यात आलेल्या सुरक्षेमध्ये कपात करावी अशी मागणी ही होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही याबाबत स्पष्ट खुलासा करण्याची गरज आहे, जेणेकरून पंतप्रधानांनी दिलेल्या 'व्हीआयपी कल्चर' संपवण्याच्या हाकेला साताऱ्यात खऱ्या अर्थाने प्रतिसाद मिळेल. 

निडर शेर…खा. उदयनराजे..

​सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले हे खऱ्या अर्थाने 'निडर' लोकप्रतिनिधी म्हणून समोर आले आहेत. जिल्ह्यात इतर आमदार-खासदार अर्धा डझन पोलिसांचा ताफा घेऊन फिरत असताना, छत्रपती उदयनराजेंच्या दिमतीला मात्र केवळ एक सशस्त्र पोलीस जवान असतो. गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या उदयनराजेंना या 'बेन्टेक्स' व्हीआयपी संस्कृतीचा कोणताही सोस नाही. चोवीस तास मतदारसंघात फिरताना त्यांच्यासोबत केवळ चालक आणि एक सुरक्षारक्षक असतो. साताऱ्यातील इतर महाभागांनी उदयनराजेंच्या या साधेपणाचा आदर्श घेऊन मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा आणि व्हीआयपी कल्चरला मूठमाती द्यावी, हीच अपेक्षा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावर बोरगाव हद्दीत भरधाव कारची दुचाकीला धडक; एक गंभीर
पुढील बातमी
फिरायला गेलेल्या कोंडवे येथील वृद्धाचा वडाची फांदी अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या