सातारच्या नगराध्यक्षपदाचा तिढा सुटला- सातारच्या नगराध्यक्षपदासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची सरशी ; नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्या नावाची घोषणा

by Team Satara Today | published on : 17 November 2025


सातारा :  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा तिढा सुटला असून या पदासाठी बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाची सरशी झाली असून नगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्या नावाची आज सोमवारी घोषणा करण्यात आली. हा तिढा सुटल्यामुळे नगराध्यक्ष पदासह उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता गती येण्यास मदत होणार आहे. 

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटामध्ये मनोमिलन झाले मात्र नगराध्यक्षपदासाठी सुंदोपसुंदी निर्माण झाली होती. चार दिवसांपूर्वी उरमोडी येथील फार्महाऊसमध्ये झालेल्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा नगर विकास आघाडीकडे नगराध्यक्षपद असावे, माझ्याकडे मंत्रिपद असल्यामुळे निधी आणायला कोणतीही अडचण येणार नाही अशी भूमिका घेतली होती. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांनी तुमच्याकडे मंत्रिपद असल्यामुळे नगराध्यक्षपद आमच्याकडे राहू द्या, असा सूर आवळल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय होत नव्हता. या पदासाठी सातारा विकास आघाडीकडून काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे तर नगर विकास आघाडीकडून अविनाश कदम, अमोल मोहिते आणि जयेंद्र चव्हाण यांची नावे पुढे आली होती. नगराध्यक्ष पदाचा निर्णय होत नसल्याने या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात ढकलण्यात आला होता. 

अखेर सोमवारी सकाळी सातारचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून शिवेंद्रसिंह भोसले समर्थक, नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विरोधी गटात असताना अमोल मोहिते यांनी सातारा नगरपालिकेच्या प्रत्येक सभेमध्ये आक्रमक भूमिका घेतल्या होत्या. कोरोना काळात प्रशासनाकडून होणाऱ्या निष्काळजीपणाची दखल घेत सर्व सामाजिक संघटना, बिगर राजकीय संघटना, सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्याचा इशारा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. नगरपालिकेचे तत्कालीन उपमुख्यधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक गणेश टोपे, प्रवीण यादव आणि कायगुडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर अमोल मोहिते यांनी आक्रमक होत सातारा पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. विरोधात असताना पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी चुकीच्या गोष्टींवर सातत्याने बोट ठेवले होते. सलग दहा वर्ष नगरसेवक राहिल्याने अमोल मोहिते यांना प्रशासनाच्या कामकाजाची चांगलीच माहिती आहे. सातारच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून अमोल मोहिते यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे नगराध्यक्षपदासह दोन्हीही विकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता गती येण्यास मदत होणार आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
"गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस राधाचा सन्मान
पुढील बातमी
झाडानीप्रकरणी २६ नोव्हेंबरला सुनावणी ; वळवी आणि कुटुंबियांना बजावली उपस्थित राहण्याची नोटीस

संबंधित बातम्या