पुसेगाव : नेहमीच निसर्ग संकटाचा सामना करणाऱ्या खटाव तालुक्यातील बुध परिसरातील शेतकऱ्यांना आता रानडुकरांच्या संकटाचा आणि दहशतीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच घेवडा व सोयाबीनच्या कोसळलेल्या दराने आर्थिक संकटात सापडला असताना आता रानडुकरांनी उभ्या पिकात धुमाकूळ घालत उच्छाद सुरू केल्याने येथील शेतकरी जेरीस आला आहे. गेल्या काही दिवसांत एका ,एका शेतात तीस डुकरांचा कळप शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात असल्याने शेतकरी दहशतीत आहे.
खटाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या पाचवीलाच कोणते ना कोणते तरी संकट पुजल्याचं दिसत आहे. अलिकडच्या काळात आता शेतकऱ्याच्या संकटात रानडुकरांची भर पडली असून शेतातील उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. कांदा,ज्वारी,गहू, ऊस, भुईमूग, मका, हरभरासह अनेक पिकं नेस्तनाबूत केली जात आहे. तालुक्यातील बुध, राजापूर रणसिंगवाडी , वेटणे , राजापूर यासह जवळपास सर्वच गांवात उच्छाद मांडला आहे.
अलिकडच्या काळात जंगल वाढू लागल्याने या परिसरात रानडुकर सोबत लांडगे,हरीण, मोर आणि वानरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी एक ना अनेक संकटाचा सामना करतोय. त्यातच शेतातील भुईमुग, मका , कांदा , हरभरामध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पिकांची नासाडी केली आहे. यामुळे शासनाने या रानडुकराचा बंदोबस्त करून रानडुक्कर मुक्त करावं, अशी मागणी या शेतकरी करत आहेत. अचानक डोंगर बाजूने रान डुकरांचा कळपच्या कळप शेतात बिनधास्तपणे घुसत असतो आणि आम्हांला त्यावेळी हतबल होऊन उभ्या पिकाची नासाडी होताना फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागते. यामुळे आमच्या घरातील स्त्रियांना डुकरांचा दहशतीमुळे शेतात नेता येत नाही. त्यामुळे कामात मिळणारा हातभार कमी झाल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे.साहजिकच आता जगावं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने रानडुकरांपासून बचावासाठी आम्हा शेतकऱ्यांना आवाजाच्या बंदुका द्याव्यात. त्याचबरोबर शेतीला कंपाउंड मारण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी बुध (ता.खटाव) येथील शेतकरी यांनी केली आहे.