कराड, दि. 10 : मोबाइलचा हॉटस्पॉट सुरू न केल्याच्या रागातून सूरज राजू मुल्ला या युवकाने वडील राजू कासम मुल्ला यांच्यावर खुरप्याने वार करून, दगडाने मारहाण केली. ही घटना ओगलेवाडी, ता. कराड येथे मंगळवारी (दि. 9) दुपारी घडली.
याबाबत राजू मुल्ला यांच्या फिर्यादीवरून सूरज मुल्ला याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओगलेवाडी येथील राजू मुल्ला हे मंगळवारी दुपारी घरात काम करत असताना, सूरज तेथे आला. त्याने राजू मुल्ला यांना त्यांच्या मोबाइलचा हॉटस्पॉट सुरू करायला सांगितले. मात्र, कामात असल्याने राजू मुल्ला यांनी नकार दिला. थोड्या वेळाने हॉटस्पॉट सुरू करतो, असे त्यांनी सांगितले. त्यावरून चिडून सूरजने घरातील खुरप्याने राजू मुल्ला यांच्यावर वार करून, दगडाने त्यांच्या चेहर्यावर व डोक्यात मारहाण केली. यामध्ये राजू मुल्ला हे जखमी झाले. शेजार्यांनी भांडणे सोडवून, राजू मुल्ला यांना रुग्णालयात दाखल केले.