मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाचपैकी तीन जागांवर भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. या तीन जागांसाठी भाजपने पाठवलेल्या उमेदवारांच्या नावांवर केंद्रीय कार्यालयाने रविवारी शिक्कामोर्तब केले. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची नावे भाजपने निश्चित केली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रत्येकी एक-एक उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे या पक्षांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, भाजपने पाठवलेल्या यादीत माधव भांडारी यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती. मात्र, पक्षाने भांडारी यांना उमेदवारी देण्याचे टाळले. भांडारी यांनी भाजपचे प्रवक्ते, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केले. मात्र, जुन्या नेत्यांऐवजी भाजपने नव्यांना संधी देण्याची भूमिका घेतल्याचे जाहीर केलेल्या नावांवरून सूचित होते.
विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक घेण्यात येणार आहे. विधान परिषदेतील या पाच जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीत या पाच जागांपैकी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाटेला किती जागा येणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु पाचपैकी तीन जागांचा प्रश्न निकाली निघाला आहे. भाजपने तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवणार आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये छत्रपती संभाजी नगरचे संजय केनेकर, वर्धाचे दादाराव केचे आणि नागपूरचे संदीप जोशी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. भाजपने दोन विदर्भातील, तर एका मराठवाड्याच्या नेत्याला संधी दिली आहे. संदीप जोशी हे गेल्या २५ वर्षांपासून भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी नागपूरच्या महापौरपदाचीसुद्धा जबाबदारी पार पाडली आहे. तसेच, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय केनेकर हे छत्रपती संभाजी नगरमधील असून त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून काम केलेले आहे, तर दादाराव केचे यांना विधानसभेच्या वेळी तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे पक्षाने त्यांना आता विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
विधान परिषदेतील भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या. त्यामुळे आता या जागांवर निवडणूक घेण्यात येत आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून निवडणूक लढण्यास अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे दिल्लीदरबारी पाठविण्यात आली होती. त्यातीलच तीन नावांवर आता भाजप केंद्रीय कार्यालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली. उमेदवारी अर्ज १० मार्चपासून दाखल करण्यास सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याची १७ मार्च ही शेवटची तारीख आहे. १८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० मार्च ही शेवटची तारीख आहे. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल, तर मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.