सातारा : सातारा तालुक्यात मानव आणि बिबट्या यांच्यात वारंवार घडणार्या संघर्षाचे परिणाम टाळण्यासाठी सातारा वनविभागाने पुढाकार घेतला आहे. सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या आदेशाप्रमाणे सातारा तालुक्यामध्ये निसर्ग अभ्यासक वैद्यकीय अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समन्वयक कार्यशाळा आयोजित करण्याचे विषय निर्धारित झाले आहेत. त्याचा एक भाग म्हणून भरतगाव येथील काशीळ माने वस्ती येथे अशा पद्धतीची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली.
या कार्यशाळेला वन्य पशु जीवतज्ञ डॉक्टर निखिल बांगर, भरतगाव येथील वनरक्षक अभिजीत कुंभार, मुकेश राऊळकर, सातारा परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल संदीप जोपले यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेमध्ये बिबट्या अचानक समोर आला असता काय काळजी घ्यावयाची याविषयी तज्ञांनी मार्गदर्शन करण्यात आले तसेच बिबट्याचे काही स्लाईड शो सुद्धा यावेळी दाखवण्यात आले. शेतात जात असताना सोबतीला घेऊन जाणे, हातात एखादी काठी असल्यास त्याला घुंगरू लावणे, मोबाईलवर संगीत लावणे, कोणाचे नाव घेऊन हाळी घालणे, वाकून किंवा बसून काम करताना आजूबाजूला लक्ष देणे इत्यादी काळजी घेण्याबाबतच्या सूचना अभिजीत कुंभार यांनी केल्या.
डॉक्टर निखिल बांगर बोलताना म्हणाले की, बिबट्या हा लाजाळू प्राणी आहे. त्याच्या नजरेच्या टप्प्यात शेळी, मेंढी, वासरू, कालवड, नवजात शिशु, कुत्री, माकड, कोंबडी असे शिकारीचे लक्ष असते. त्यामुळे आपले लहान मुल त्याचे भक्ष्य नाही पण आपली लहान मुले बसून वाकून खेळत असतात. बिबट्याला वाटते की ती भक्ष्य आहेत. आणि त्यामधून तो हल्ला करतो. जर मनुष्य त्याचे खाद्य असता तर तो गाव वस्तीत येऊन घरातून माणसांना पकडून घेऊन गेला असता. तसा तो न करता मनुष्य पाहिला की पळून जातो. म्हणजेच तो मनुष्य प्राण्याला घाबरतो. एखाद्या ठिकाणी बिबट्या बसलेला दिसला किंवा अडकलेला दिसला तर त्या ठिकाणी न जाता किंवा गोंधळ न घालता वनविभागाशी संपर्क करा, असे आवाहन डॉक्टर निखिल बांगर यांनी शेवटी केले.