सातारा वनविभागाला मिळाली रुग्णवाहिका व रेस्क्यू वाहन; स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण

by Team Satara Today | published on : 15 August 2026


सातारा : जिल्ह्यातील वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या कामाला आता आधुनिक साधनसुविधांची जोड मिळाली आहे. जखमी, आजारी अथवा संकटात सापडलेल्या वन्यजीवांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यासाठी सातारा वनविभागाच्या ताफ्यात वन्यजीव रुग्णवाहिका आणि विशेष रेस्क्यू वाहन दाखल झाले आहे.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या दोन्ही वाहनांचे लोकार्पण राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना’ या राज्य योजनेअंतर्गत लेखाशीर्ष 2406-2232 मधून सातारा वनविभागाला 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून बचाव व उपचारासाठी आवश्यक असलेल्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने विविध प्रकारच्या वन्यजीवांचा अधिवास येथे आढळतो. वनक्षेत्रालगतच्या मानवी वस्त्यांमध्ये वन्यजीवांचा वावर वाढल्याने विहिरीत पडणे, वाहनांच्या धडकेत जखमी होणे, वस्तीत शिरणे किंवा अन्य कारणांमुळे संकटात सापडण्याच्या घटना घडतात. अशा वेळी वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी तातडीने पोहोचून वन्यजीवांचा सुरक्षित बचाव करण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या नियोजनातून वन्यजीव संरक्षणासाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे. रेस्क्यू मोहिमेसाठी आवश्यक साधनसामग्रीची सुविधा वाहनांमध्ये असल्याने बचावकार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे करण्यास मदत होणार आहे. जखमी वन्यजीवांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेत त्यांना उपचार केंद्रापर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.

अपघातग्रस्त वन्यजीव, विहिरी अथवा अन्य ठिकाणी अडकलेले प्राणी आणि मानवी वस्तीत आलेले वन्यजीव यांच्या बचावासाठी या वाहनांचा प्राधान्याने वापर केला जाणार आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे जखमी व आजारी वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासोबतच त्यांच्या पुढील पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक परिणामकारकपणे राबविता येणार आहे.

कराड तालुक्यातील वराडे येथील वन्यजीव उपचार केंद्रालाही या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. रेस्क्यूपासून उपचार आणि पुनर्वसनापर्यंतची यंत्रणा अधिक सक्षम होण्यास या वाहनांची मदत मिळणार आहे.

वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील वनविभागाच्या बचाव यंत्रणेला मिळालेले हे आधुनिक बळ महत्त्वपूर्ण मानले जात आहे. संकटात सापडलेल्या वन्यजीवांना तत्काळ मदत मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षित उपचार व पुनर्वसनाला या सुविधेमुळे गती मिळणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील पाच गावांच्या उपसा सिंचन योजनेचा भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात; 11 महिन्यांत भागात पाणी आणण्याची आ. महेश शिंदे यांची ग्वाही
पुढील बातमी
तिरंग्याला मानवंदना देत सातारा नगरपरिषदेचा विकासाचा निर्धार; नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण

संबंधित बातम्या