सातारा तालुक्यातील वाढे फाटा येथे आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा; संशयितास अटक

स्थानिक गुन्हे शाखेची धाड; मोबाईल, कागदपत्रे व बनावट आधार जप्त

by Team Satara Today | published on : 13 April 2026


सातारा :  सातारा तालुक्यातील वाढे फाटा परिसरातील एका लॉजमध्ये आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने छापा टाकून एका संशयिताला अटक केली. मोबाईलद्वारे सामन्याचे थेट दृश्य पाहत सट्टा खेळणे व स्वीकारणे हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

संजय नरेश बहादूर (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे खरे नाव असून, त्याने ‘आदित्य नरेश यादव’ या बनावट नावाने लॉजमध्ये प्रवेश घेतल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता सादर केलेले आधार कार्ड बनावट असल्याचे समोर आले.

माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई या सामन्यावर ऑनलाईन बेटिंग करत असल्याचेही स्पष्ट झाले. या कारवाईत पोलिसांनी दोन मोबाईल, एक वही, दोन पेन, काही संशयास्पद कागदपत्रे व बनावट आधार कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधिताने लॉजच्या नोंदवहीत मुंबईहून साताऱ्यात फिरण्यासाठी आल्याची नोंद केली होती.

संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस हवालदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, स्वप्नील शिंदे व स्वप्नील कुंभार यांच्या पथकाने केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बाबासाहेबांचे संविधान म्हणजे... एकसंघ भारताची पोलादी चौकट
पुढील बातमी
सातारा नगरपालिकेचा पाणी कपातीचा निर्णय; १५ एप्रिलपासून पाणीपुरवठ्यात कपात; आठवड्यातून एक दिवस बंद

संबंधित बातम्या