रात्री ११ वाजण्यापूर्वी शहरातील हॉटेल्स, धाबे, बार बंद करा; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुज्ञ सातारकरांची मागणी

by Team Satara Today | published on : 12 November 2025





सातारा : सातारा जिल्ह्यात ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून ९ पैकी सातारा आणि कराड या दोन नगरपालिका राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जातात. या निवडणुका निर्भय आणि दहशतमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सातारा शहर व परिसरातील हॉटेल्स, धाबे, बार रात्री ११ वाजण्यापूर्वी बंद करण्याचा फतवा जिल्हा प्रशासनाने काढावा, अशी मागणी सुज्ञ सातारकरांमधून होत आहे. 

अनेक वर्षाची प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा अखेर झाली. ही निवडणूक राजे विरुद्ध राजे अशी होते का भाजपच्या चिन्हावर लढवली जाते, याबाबत सातारकरांना उत्सुकता लागून राहिली असतानाच बांधकाम मंत्री तथा नगर विकास आघाडीचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले आणि मी एकच आहोत असे सांगत मनोमिलनाचे संकेत दिल्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला. ही निवडणुक भाजपच्या कमळ या चिन्हावरच लढवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी प्रत्यक्षात सातारा शहरात भाजपकडून ५० नगरसेवक पदांसाठी तब्बल ५०० तर नगराध्यक्षपदासाठी २६  इच्छुकांनी मुलाखती दिल्यामुळे सातारा नगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी उफाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारामध्ये गेल्या दोन वर्षापासून दोन्ही राजांच्या अनेक माजी नगरसेवकांनी नगरपालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली होती. प्रभागामध्ये सामाजिक उपक्रम राबवणे, सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गाउत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यासह प्रभागातील गोरगरीब  नागरिकांना वैयक्तिक पातळीवर मदत केली जात होती.

त्यामुळे दोन्ही राजांसाठी बंडखोरांना शांत करण्यासाठी कमालीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मनोमिलनामुळे सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्यात होणाऱ्या जागा वाटपानंतर निराश झालेल्या बंडखोरांसाठी मविआ हा पर्याय शिल्लक असल्यामुळे सातारा नगरपालिकेची निवडणूक एकतर्फी होईल, असा दावा आत्ता तरी कोणी करू शकत नाही. 

मविआचे प्रमुख तथा शरच्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी राजकीय सुज्ञपणा दाखवत सातारमध्ये भाजप कोणती रणनिती आखत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी ठेवल्या आहेत. मुलाखती गुरुवारी ठेवल्या असल्या तरी जोपर्यंत सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होत नाही, तोपर्यंत मविआ आपले पत्ते ओपन करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. मविआ ऐनवेळी नवीन चेहऱ्यांना संधी न देता   दोन्ही राजाकडून दुखावल्या गेलेल्या इच्छुक नगरसेवकांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता असल्यामुळे सातारा नगरपालिकेची निवडणूक फार सोपी राहणार नाही. दोन्हीही राजे कोणत्याही परिस्थितीत सातारा नगरपालिका आपल्याकडेच रहावी यासाठी प्रयत्न करणार हे निश्चित. दुसरीकडे बंडखोरांच्या मदतीने सातारा नगरपालिकेत शिरकाव करण्याचा प्रयत्न मविआकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त शहरातील शांतता अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्थेला कोणतेही गालेबोट लागू नये त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने सातारा शहर व परिसरातील हॉटेल्स, धाबे, बार रात्री ११ वाजण्यापूर्वी बंद करण्याचा फतवा जिल्हा प्रशासनाने काढावा, अशी मागणी सुज्ञ सातारकरांमधून होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुशी येथे 50 हजार रुपयांच्या सोयाबीनची चोरी

संबंधित बातम्या