शेवग्याच्या झाडावर शेंगा काढण्यासाठी चढलेल्या युवकाचा शॉक लागून जागीच मृत्यू ; पाटण तालुक्यातील घटना

by Team Satara Today | published on : 08 November 2026


पाटण : विहेनजीक नहिंबे-चिरंबे (ता. पाटण) येथे शेवग्याच्या झाडावर शेंगा काढण्यासाठी चढलेल्या युवकाचा ११ हजार व्होल्ट क्षमतेच्या विद्युत वाहिनीचा जोरदार शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दीपक मारुती साळुंखे (वय २८, रा. नहिंबे-चिरंबे) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नहिंबे-चिरंबे येथील दीपक मारुती साळुंखे हा युवक जोतिबा मंदिर परिसरातील पाटील यांच्या शेतात असलेल्या शेवग्याच्या झाडावर शेंगा काढण्यासाठी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चढला होता. झाडावर अंदाजे दहा फूट उंचीवर गेल्यानंतर त्याला तेथून जाणाऱ्या ११ हजार व्होल्ट क्षमतेच्या विद्युत वाहिनीचा जोरदार शॉक लागला. या विद्युत धक्क्यामुळे दीपक याचा जागीच मृत्यू झाला.
पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन पाटील व पृथ्वीराज पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आई-वडिलांसोबत झोपलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू; फलटणच्‍या महात्मा फुले चौकातील घटना
पुढील बातमी
फडतरवाडी व भाडळे येथील राखीव वनक्षेत्रात खैराची २१ झाडे तोडताना तिघे वनविभागाच्या जाळ्यात; संशयितांना एक दिवसाची वनकोठडी

संबंधित बातम्या