सातारा : सासवड, ता. फलटण येथील शंभूराज संतोष राऊत या अकरा वर्षीय मुलावर फलटणचे डॉक्टर युवराज कोकरे यांनी चुकीचे पायाचे ऑपरेशन केल्याने त्याला अपंगत्व आले आहे, असा आरोप त्याचे वडील संतोष राऊत यांनी पत्रकार परिषदेत करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात कारवाई न झाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती संतोष राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. संतोष राऊत यांचा मुलगा शंभूराज याचा पसरणी घाटात अपघात झाला होता. त्या अपघातात पायाला दुखापत झाल्याने त्याला फलटण येथील डॉक्टर युवराज कोकरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टर कोकरे यांनी त्याच्या पायाचे ऑपरेशन केले आणि पायाला फिक्सर लावून प्लास्टर केले. सात आठवड्यानंतर ते काढण्यात आल्यानंतरही त्याच्या पायाची सूज उतरली नव्हती. त्याला अधिक उपचारासाठी पुण्यात हलवले असता तेथे डॉक्टरांनी त्याचा पाय कापावा लागेल, असे सांगितले. यासंदर्भात पुण्याला रेफर करताना डॉक्टर कोकरे यांनी दुसऱ्या हॉस्पिटलचे पत्र दिले.
संबंधित डॉक्टरांनी माझ्या मुलावर चुकीचे उपचार केले. त्यामुळे शंभूराज चा उजवा पाय गुडघ्याच्या खाली कापावा लागला. त्याला शारीरिक अपंगत्व आले आहे. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी, सातारा पोलीस अधीक्षक यांच्यासह महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्री यांच्याकडे दाद मागितली आहे. या प्रकरणासंदर्भात आम्हाला न्याय न मिळाल्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या दालनासमोर आम्ही 26 जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.