सातारा : शहर परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीला इंस्टाग्रामवरून शारीरिक संबंधाची मागणी केल्या प्रकरणी हर्ष अजित ढेबे (पूर्ण पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान ही घटना वेळोवेळी घडली आहे. पीडित अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील हर्ष ढेबे याने त्याच्या इंस्टाग्रामच्या दोन्ही अकाउंटवरून फिर्यादीचे सासरे यांच्या इंस्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवून अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून छुपा पाठलाग करून तिच्यासोबत मैत्री करून, तिच्यासोबत प्रेम संबंध आहेत असे सांगून इतर अनोळखी महिलांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पाठवून तिला अश्याच पद्धतीचे अर्धनग्न फोटोची मागणी केली. तिची इच्छा नसताना देखील तिने तिचे अर्धनग्न फोटो त्याला पाठवले. ते पाहून तिला शारीरिक संबंधाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी हर्ष अजित ढेबे याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक साबळे करत आहेत.