उंब्रज : कराड तालुक्यातील कोर्टी येथील कॅनरा बँकेच्या शाखेतून ११ लाख ७० हजार ८०० रुपयांची रोकड आणि सुमारे ३१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐवज अपहार केल्याप्रकरणी बँक मॅनेजरविरुद्ध उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असून या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात आणि कराड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश कुमार सिंग (रा. पंचायत पंतरोडीह ग्राम, सेन्ट्रलपीट, पो. एस. पी. कोलियरी, पोलीस ठाणे गिरिडीह, झारखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या बँक मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी कुअर अमोघ कृष्णकुमार आस्ताना (रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. कोर्टी येथील कॅनरा बँकेच्या एटीएममधील काही रोकड रक्कम आणि बँकेत गहाण ठेवलेली सोन्याची पाकिटे गहाळ झाल्याची माहिती बँकेच्या सहाय्यक शाखा अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला दिली होती. या माहितीच्या आधारे बँकेच्या वतीने कोर्टी शाखेची अंतर्गत चौकशी आणि सखोल पाहणी करण्यात आली.
या अंतर्गत तपासणीदरम्यान बँकेच्या एटीएममधील ११ लाख ७० हजार ८०० रुपयांची रोकड गायब असल्याचे समोर आले. याचबरोबर सोने तारण कर्जाअंतर्गत जमा असलेल्या पाकिटांची तपासणी केली असता, १५४.१७ ग्रॅम वजनाची दोन पाकिटे आणि इतर सहा पाकिटांमधील १६५.५३ ग्रॅम वजनाचे सोने मिळून एकूण ३१९.७० ग्रॅम (सुमारे ३१ तोळे) वजनाचे दागिने गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले. हा सर्व ऐवज तत्कालीन बँक मॅनेजर नितेश कुमार सिंग यांनीच संगनमताने अथवा स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.