सातारा : सातारा नगरपालिकेच्या दोन माजी आरोग्य निरीक्षकांची सातारा शहरातील एका उड्डाणपुलाखाली आर्थिक कारणावरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ प्रसार माध्यमांच्या हाती लागल्याने पालिकेतले चिरीमिरीचे राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे.
सातारा पालिका आणि तेथील मलईदार टेंडर याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेहमी चविष्ट चर्चा असते. येथील बांधकाम विभाग बिलो टेंडर आणि अबॉव्ह टेंडरचा पद्धतशीर खेळ करून मर्जीतल्या ठेकेदाराला ते काम मिळून देण्यामध्ये पटाईत आहे. आरोग्य विभागामध्ये घंटागाडी आणि त्याची बिले म्हणजे रस्सा ओरपून भरपेट जेवण्याचा प्रकार आहे. सातारा पालिकेचे दोन माजी आरोग्य अधिकारी अशाच काहीशा आर्थिक कारणावरून बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाखाली तंटत असल्याचे दिसून आले. या भांडणाला सातारा पालिकेचे विद्यमान आरोग्य अधिकारी साक्षीदार होते. विषय होता काही जुन्या देण्याघेण्याचा, जो सातार्यातून मिळणार होता. दोन्ही आरोग्य निरीक्षक सातारा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये बदलून गेले आहेत. दोन्ही आरोग्य निरीक्षक हे सातार्यात राहण्यासाठी असून अजूनही त्यांचे लागेबांधे सातारा पालिकेशी आहेत. कामाच्या संदर्भात सहकार्याचा अथांग सागर असणारा नव्या जोशाचा आरोग्य निरीक्षक हा एकेकाळी व्यवस्थापनाच्या गळ्यातील ताईत होता, तर दुसर्या आरोग्य निरीक्षकाच्या कामाचा प्रकाश फारसा न पडल्याने तो आरोग्य निरीक्षक प्रशासक अभिजीत बापट यांच्या गुड बुक मध्ये कधीच नव्हता. अशा दोन आरोग्य निरीक्षकांची हमरातुमरी काही जणांनी गोपनीयरित्या चित्रित केली. ही हमरातुमरी आर्थिक देवाणघेवाणीच्या संदर्भातील होती. आता ही कोणत्या हिशोबाची देवाण-घेवाण होती, हे मात्र समजले नाही. मात्र तू इतका शहाणा झाला आहेस का ?,तू काय पालिकेचा मालक आहेस का, अशा भाषेमध्ये दोन्ही आरोग्य निरीक्षकांनी एकमेकांचे वाभाडे काढले.
एकूणच या प्रकारामुळे सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सातारा पालिकेत 13 टक्क्यांचे राजकारण चालते, असे म्हटले जात होते. कोणत्याही ठेकेदाराला विचारले असता टेंडर मिळताना बरीच भागवाभागवी करावी लागते, असे ठेकेदार वैतागून सांगतात. त्यामध्ये आरोग्य विभागही येतो. तेथील घंटागाडीची बिले, मुकादमांच्या माध्यमातून करार तत्वावर काम करणारे सफाई कामगार असा गळतीला बराच वाव आहे. त्यामुळेच या दोन माजी आरोग्य निरीक्षकांची भांडणे झाल्याची सातारा पालिकेत जोरदार चर्चा आहे.