खंडाळा : पुणे-बंगळुरू महामार्गावरील पारगाव खंडाळा येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या दोन विचित्र अपघातांत तीन चारचाकी वाहनांचा चक्काचूर झाला.
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चारचाकी (एमएच १४ ईवाय ६८७८) वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. चालकही गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे पुणे बाजूकडून येणारी महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
दरम्यान, या अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये थांबलेल्या आणखी एका चारचाकी वाहनाला (एमएच १२ एलपी ७०२६) पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने (एमएच ११ बीव्ही ६९३३) जोरदार धडक दिली. या धडकेतही समोरील वाहनातील एकजण जखमी झाले व दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.
या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार राजू अहिरराव, पोलिस चालक दिग्विजय पोळ व शिरवळ रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद करण्याचे काम खंडाळा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
केसुर्डी फाटा ते खंडाळा परिसरात वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी विजेची सोय नसल्याने महामार्गावर पूर्णपणे काळोख पसरलेला असतो. अशातच रस्त्याचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी आजपर्यंत जीव गमावले असून, महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी विज उपलब्ध करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.