सातारा : राज्यातील घाट रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सरकारने व्यापक सुरक्षा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर-प्रतापगड-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटाच्या पायथ्याशी कुंभरोशी येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कायमस्वरूपी आपत्कालीन मदत केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री भोसले म्हणाले की, घाट रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये तातडीने मदत उपलब्ध व्हावी, बचावकार्याला गती मिळावी आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी हे मदत केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात घडल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा येथे उपलब्ध केली जाणार आहे.
याशिवाय राज्यातील घाट मार्गांवर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित क्रॅश बॅरिअर्स उभारणे, दरीलगतच्या धोकादायक ठिकाणांची सुरक्षितता वाढविणे, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम करणे तसेच आवश्यकतेनुसार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा आराखडाही तयार करण्यात येणार आहे. या कामांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंबेनळी घाटात काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात सात तरुणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घाट रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री भोसले यांनी राज्यातील सर्व धोकादायक घाट मार्गांवर सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याची ग्वाही दिली.
सुरक्षा आराखड्यातील प्रमुख उपाययोजना
कुंभरोशी येथे संयुक्त पोलीस-पीडब्ल्यूडी मदत केंद्र
अपघातांसाठी सक्षम आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था
आधुनिक क्रॅश बॅरिअर्सची उभारणी
दरीलगतच्या धोकादायक ठिकाणांचे संरक्षण
आवश्यकतेनुसार रस्त्यांचे रुंदीकरण
सुरक्षा उपायांसाठी स्वतंत्र निधी
बचावकार्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा
"घाट रस्त्यांवरील प्रत्येक प्रवाशाचा जीव सुरक्षित राहावा, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे," असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.