शेखर चरेगावकर यांची कोठडी वाढली; कराड न्यायालयाने दिली सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी; सातारा आर्थिक गुन्हे शाखेचे गुंतवणूकदारांना आवाहन

by Team Satara Today | published on : 02 March 2026


सातारा : भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांना कराड न्यायालयातील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी दि. 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मुदत संपल्यानंतर आज पुन्हा त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ करून 6 मार्च अखेर चरेगावकर यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख ५७ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चरेगांवकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना दिनांक 25 रोजी पहाटेच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इनामदार यांनी त्यांच्या घरातून अटक केली होती. या घोटाळ्याप्रकरणी शेखर चरेगांवकर यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी आणि नातेवाईक अशा एकूण ५० जणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१४ ते २०२५ या कालावधीत यशवंत सहकारी बँकेत सुमारे १९५ बोगस कर्ज खाती उघडून, कोणतेही तारण न घेता आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला असल्याचा आरोप संबंधितांवर आहे.

चरेगावकर यांना अटक केल्यानंतर कराड न्यायालयातील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्यासमोर सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी या खटल्यातील पार्श्वभूमी सांगून या खटल्यामधील याचिकाकर्ते आणि गुंतवणूकदार यांची वस्तुस्थिती सांगून न्यायालयाकडे चरेगांवकर यांच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने चरेगावकर यांना दोन मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज दिनांक दोन रोजी चरेगावकर यांना न्यायालयासमोर हजर केले असता या गुन्ह्याचे तपासी अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रऊफ इनामदार आणि सरकार पक्षाच्या वतीने जाधव यांनी चरेगावकर यांच्या अधिक पोलीस कोठडीची मागणी केली. चरेगावकर यांचा गुन्ह्यातील सहभाग आणि इतर तपास करण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने  चरेगांवकर यांना सहा मार्चपर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातारा आर्थिक गुन्हे शाखेचे गुंतवणूकदारांना आवाहन 

दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण, शाखा कराड, जिल्हा सातारा या बँकेमध्ये फसवणूक झाल्याची व्याप्ती मोठी असून ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे आणि त्यांची फसवणूक झाली आहे, अशा सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दिनांक 4 मार्च ते 30 मार्च अखेर सकाळी 10 ते दुपारी 12:30 पर्यंत सातारा आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे गुंतवणूक केल्याचा पुरावा, पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड च्या दोन झेरॉक्स घेऊन हजर राहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'स्वतःच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं सरकार शेतकऱ्यांना काय तारणार?'; आमदार शशिकांत शिंदेंचा सरकारवर घणाघात
पुढील बातमी
मुलीवर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी केलेल्या खूनप्रकरणी एकाच कुटूंबातील चौघांना अटक; काहीही धागेदोरे गुन्हा उघडकीस आणला

संबंधित बातम्या