महिला शिक्षिकेला मारहाणप्रकरणी मुख्‍याध्‍यापकाला अटक; वाई तालुक्‍यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ, विद्यार्थ्याला दिलेल्या हीन वागणुकीचा जाब विचारल्याच्या राग

by Team Satara Today | published on : 17 July 2026


वाई : विद्यार्थ्यांना मारहाण का केली, असे बोलल्याच्या रागातून खावली येथील जि. प. शाळेत एका मुख्याध्यापकाने आपल्याच सहकारी महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाई पोलिसांनी संशयित मुख्‍याध्‍यापकाला अटक केली आहे. यामुळे वाई तालुक्‍यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र विष्णू दीक्षित (रा. वडवली, ता. वाई) असे अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

पीडित महिला शिक्षिका या खावली शाळेत कार्यरत आहेत. त्या काही दिवसांपूर्वी ५ दिवसांच्या शासकीय प्रशिक्षणासाठी पाचवड येथे गेल्या होत्या. त्या दरम्यान शाळेतील एका विद्यार्थ्याला वर्गाबाहेर चप्पल काढतात त्या ठिकाणी बसवून मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित याने हीन वागणूक दिली होती. प्रशिक्षण संपवून जेव्हा महिला शिक्षिका शाळेत परतल्या तेव्हा पीडित विद्यार्थ्याचे वडील संतोष वाडकर (रा. माची, ता. वाई) यांनी वर्गशिक्षिका म्हणून त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली. यावर संबंधित महिला शिक्षिकेने मुख्याध्यापक दीक्षित याला विचारणा केली.

मात्र, मुख्याध्यापक दीक्षित याने दमदाटी करत, तुम्ही वर्गशिक्षिका आहात, तुम्हीच काय ते मिटवा, माझ्याकडे का आलात? असे म्हणत थेट तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली. दि. १६ रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास शाळेत मुख्याध्यापक दीक्षित हा वर्गातील दोन मुलांना मारहाण करत होता. ते पाहून संबंधित महिला शिक्षिका यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला व मुलांना परिपाठासाठी पाठवण्यास सांगितले. या रागातून दीक्षित याने महिला शिक्षिकेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

यावेळी पाठलाग करून दीक्षित याने संबंधित महिला शिक्षिकेला मारहाण केली. याप्रकरणी संशयित मुख्‍याध्‍यापकावर वाई पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. यानंतर त्‍या मुख्‍याध्‍यापकाला अटक करण्‍यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजपथ परिसरातील 'त्या' घटनेबाबतचे वृत्त चुकीचे; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचे आवाहन
पुढील बातमी
दौंड तालुक्यातील खडकी येथील श्रावणी कुदळे नीट परीक्षेत राज्यात प्रथम; महाराष्ट्र व ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक

संबंधित बातम्या