सातारा : स्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर रस्ता दुसरा बांधत असताना त्याबाबतची विचारणा केली म्हणून मारहाण करण्यात आली. याबाबतची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात करायला गेल्यानंतर दखल न घेतल्याने आज दि. 16 एप्रिल रोजी सातारा जिल्हा न्यायालय परिसरात आत्मदहन करणार असल्याचा इशारा दाम्पत्याने दिला आहे.
जावली तालुक्यातील एका गावातील दाम्पत्याने याबाबतची सातार्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संबंधित कुटुंबियाला गेल्या 4 वर्षांपासून त्रास दिला जात आहे. चार वर्षापूर्वी 10 ते 15 जणांनी तक्रारदार यांचे घर पाडून मुलीचा व महिलेचा विनयभंग केला. त्यावेळीही मेढा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संशयितांवर कारवाई होणे गरजेचे असताना त्यामध्ये न्याय मिळाला नाही. गुन्हा दाखल होण्यासाठी न्यायालयात हेलपाटे मारावे लागले. गेल्या 3 वर्षापासून तक्रारदार कुटुंबिय पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर आयजी कार्यालय येथे जावून कैफियत मांडत आहेत. मात्र तक्रारदार यांना न्याय मिळाला नाही, असा तक्रारदार दाम्पत्याने आरोप केला आहे.
6 एप्रिल 2025 रोजी तक्रारदार कुटुंबिय यांच्या रानातून एका हॉटेल चालकाने डांबरी रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. यावर तक्रारदार कुटुंबियांनी संबंधित हॉटेल चालकाला जाब विचारला असता त्याने व पूर्वीच्या जुन्या भांडणातील काही संशयितांनी पुन्हा तक्रारदार महिलेला मारहाण केली. यावर संबंधित महिलेने बामणोली येथे उपचार घेतले. मात्र मेढा पोलिसांनी या घटनेचीही गंभीर दखल घेतली नाही. मेढा पोलीस पक्षपातीपणा करत असून बुधवारी दि. 16 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहनाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.