कराड : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना जीवंतपणे छातीत गोळ्या घालण्याची धमकी भाजपाचे प्रवक्ता पिंटू महादेवन यांनी केरळमधील एका भाषणात उघडपणे दिली होती. या अमानुष व लोकशाहीला गळा घालणाऱ्या वक्तव्याचा कराडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे केरळचे मुख्यमंत्री यांना संबंधित प्रवक्त्याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, राजेंद्र चव्हाण, माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात, पाटील, अधिकराव गरुड, दिग्विजय सूर्यवंशी, सुभाषराव पाटील, विठ्ठलराव शिखरे, नानासो जाधव, दीपक पाटील, गजानन आवळकर, संजय माळी, दत्तात्रय काशीद, शशिकांत महापुरे, नितीन पाटील, आनंदराव जाधव, शंकरराव पवार, कराड चे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, संतोष जगताप, पंकज पिसाळ, भीमराव पाटील, शब्बीर मुजावर, देवदास माने, जयवंतराव पाटील, सुरेश भोसले, सयाजी पाटील आदिसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घटनेचा जाहीर निषेध : रणजीतसिंह देशमुख
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, “विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये संविधान बचावासाठी चळवळ उभी केली आहे. मात्र, या विचाराला दडपून टाकण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. याचाच प्रत्यय भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्या वक्तव्याने झाला आहे. महात्मा गांधींजींची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने राहुल गांधींची हत्या करण्याचा कट त्यांनी व्यक्त केला, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. संविधान वाचवण्याचा विचार देशभर राहुल गांधी करत असताना भाजप त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व कराड दक्षिण काँग्रेस कमिटी यांच्यावतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.