तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
एमआयडीसीमध्ये सर्जेराव साळुंखे यांची एसकेएस ही कंपनी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडली जाते. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पहिला भीषण स्फोट झाला. कंपनीतील बॉयलर अथवा रिॲक्टरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटानंतर रिॲक्टरचे झाकण 100 मीटर अंतरावर जाऊन पडले होते. पहिल्या स्फोटानंतर कंपनीत टँक व बॅरलचे आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झाल्याने काही क्षणातच संपूर्ण कंपनीने पेट घेतला. या कालावधीत सह्याद्री कारखाना, कराड नगरपालिका, जयवंत शुगर कारखान्याच्या अग्निशमन बंबांना आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करत सुमारे 50 ते 55 फूट उंच आगीच्या ज्वाला पाहावयास मिळत होत्या. सुमारे अडीच तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या कालावधीत संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाल्याने सर्जेराव साळुंखे यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, असे असले तरी सुदैवाने घटनेवेळी कंपनी बंद असल्याने जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, एमआयडीसी परिसरातील तासवडे, वराडे, वहागाव, तळबीड, घोणशीसह 10 किलोमीटरपर्यंतच्या गावांमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच, काही गावांतील घरांना तडे गेले असून, आवाजामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.