तमाशा कलावंतांवरील भ्याड हल्ल्याचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून निषेध; संरक्षणाची मागणी

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा: संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे तमाशा कलावंत, विशेषतः महिला कलावंतांवर गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आणि छेडछाडीच्या प्रकाराचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि तमाशा कलावंतांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

​या संदर्भात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय मुख्य समन्वयक डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे, उपाध्यक्ष प्रा. गौतम काटकर तसेच प्रवक्ते कॉ. अविनाश कदम व कॉ. विजय मांडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. सध्या गावोगावी जत्रांचा हंगाम सुरू असून, तमाशा फड मालक आणि कलाकार आपली कला सादर करून कुटुंबाच्या उपजीविकेसाठी कष्ट करत आहेत. मात्र, अशावेळी त्यांना सन्मानाने जगण्याऐवजी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे संगमनेरमधील घटनेवरून स्पष्ट होत आहे.

​सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळावर झालेला हा हल्ला लोककलावंतांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारा आहे. तमाशा फडातील महिला व पुरुषांवर झालेला हा भ्याड हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा असून समाजकंटक कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे हे विदारक उदाहरण असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी नमूद केले.

​अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ गुन्हा दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही, तर शासनाने तमाशा फड मालकांना व कलाकारांना ठोस संरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी प्रवक्ते कॉ. विजय मांडके व कॉ. अविनाश कदम यांनी केली आहे. लोककलावंत सुरक्षित असतील तरच कला टिकेल आणि कला टिकली तरच लोकसंस्कृती जिवंत राहील, असेही विद्रोही सांस्कृतिक चळवळीने या पत्रकात म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्थायीच्या सभेत आरोग्य निरीक्षकाची झाडाझडती; १८० विकासकामांना सातारा नगरपालिकेचा हिरवा कंदील

संबंधित बातम्या