श्रीक्षेत्र बोरबन येथे हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात सुरु; अखंड विठ्ठल नामाचा गजर

by Team Satara Today | published on : 30 May 2026


सातारा : श्रीक्षेत्र प्राचीन स्वयंभू विठ्ठल मंदिर, क्षेत्र बोरबन,ता. कोरेगाव जि. सातारा येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ मे पासून सोहळ्यास आरंभ झाला असून या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

या सप्ताहामध्ये अखंड नामजप, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस २४ तास अखंड विठ्ठल नामाचा गजर सुरू राहणार असून भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरत आहे.

सोहळ्यामध्ये ह.भ.प. श्रीगुरु हरिदास महाराज देवकर, ह.भ.प. भगवानबाबा महाराज पवार, ह.भ.प. योगेशमूर्ती देवकर महाराज पाटील, ह.भ.प. श्रीपाद महाराज कागलकर, ह.भ.प. एकनाथ महाराज नामदास, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देवकर, ह.भ.प. गुरुवर्य जगन्नाथ माऊली कदम तसेच ह.भ.प. भागवताचार्य विष्णुपंत महाराज चामणर आदी मान्यवरांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत.

दररोज पहाटे काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन आणि रात्री हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. तसेच भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून नामसप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यामुळे क्षेत्र बोरबन परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आशियातील खाेल दरी असलेली 'सांदन व्‍हॅली' सातारच्या नारीशक्‍तीकडून सर; मोहिम १२ तासात पूर्ण, साहसी ट्रेकचे कौतुक

संबंधित बातम्या