सातारा : जुलै महिन्यातील दमदार पावसाने पुष्प पठार कासवर पांढऱ्याशुभ्र चवर फुलांचे आगमन झाले असून, लवकरच येथील फुलोत्सवाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. फुलांची रंगीबेरंगी दुनिया लवकरच कास पठारावर अवतरणार आहे. पठार परिसरात पावसाने उघडीप दिल्याने रिमझिम पावसात, धुके, थंडगार वारा अशा वातावरणामध्ये पर्यटकांची पावले कासकडे वळत आहेत.
कास पुष्प पठार पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. गेली काही दिवस या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे कास पुष्प पठारावरील वातावरण अल्हाददायक बनले आहे. पठारावर सध्या चवर फुलांचा भर दिसत आहे. इतरही रंगीबेरंगी फुले उमलायला पठारावर सुरुवात झाली आहे.
कास पुष्प पठार पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. गेली काही दिवस या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे कास पुष्प पठारावरील वातावरण अल्हाददायक बनले आहे. पठारावर सध्या चवर फुलांचा भर दिसत आहे. इतरही रंगीबेरंगी फुले उमलायला पठारावर सुरुवात झाली आहे. पठार परिसरात पावसाने उघडीप दिल्याने रिमझिम पावसात, धुके, थंडगार वारा अशा वातावरणामध्ये पर्यटकांची पावले कासकडे वळत आहेत.
कास पठार परिसरातील एकीव, वजराई धबधबा, कास तलावाचा पायऱ्यांवरील पाण्याचा नजारा आदी ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत. पठारावर चवर फुलांनी आपला बहर सुरू केला असून, छोटी-मोठी फुले उमलायला सुरुवात झाल्याने या ठिकाणी व्यवस्थापन करणाऱ्या समित्यांमधील सदस्यांनी, तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगामी हंगामाबबत तयारी सुरू केली आहे.
पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा या ठिकाणी कशा उपलब्ध करता येतील, यासाठी वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह समितीतील सदस्य व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्याप्रमाणे कास पुष्प पठारावर आता हंगामाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. संपूर्ण पठारावर जाळी मारण्याचे काम महिन्याभरापूर्वीच करण्यात आले असून, आता पठारावर येणाऱ्या पर्यटकांची वाहने व पर्यटकांना सूचना करण्यासाठी शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.