सातारा : "शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे कार्य त्यांचे महाराष्ट्र अंनिसचे शिलेदार नेटाने पुढे नेताना दिसतात. म्हणूनच त्यांचे कार्य व विचार अमरच राहतील." असे ठाम प्रतिपादन बाल आनंद मेळाव्याचे प्रमुख संयोजक केंद्रप्रमुख आर. टी. दळवी यांनी केले.
गांजे, ता.जावली येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेचा बाल आनंद मेळाव्यात दळवी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीतर्फे, "वैज्ञानिक दृष्टिकोन-जाणीवा जागृती अभियान" अंतर्गत 'मनोरंजनातून विज्ञान' हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार यांनी गांजे गावचे प्रथम नागरीक विकास देशमुख यांच्या हस्ते बीनवातीचा पाण्याचा दिवा प्रज्वलित करून उद्घाटन केल्याचे जाहीर केले. तदनंतर नारळातून करणी काढणे व लंगर सोडविणेच्या चमत्काराचे बाल गोपाळांचे प्रातिनिधिक सहभागाने सादरीकरण केले. कायदा विभाग सदस्य ॲड. हौसेराव धुमाळ यांनी अंगात येणे व तदनुषंगीक चमत्कारांची कारणमिमांसा विषद करून जिभेतून त्रिशूळ आरपार करून दाखवले. दुस-या टप्यात पोतदार यांनी उभ्या दोरीवर नारळाची कवटी चालविणे व थांबविणे हा चमत्कार दाखवला. तसेच २,१०० खिळ्याच्या पाटावरून चालणे व झोपणे हा चमत्कार युवा कार्यकर्ता वीर पोतदार याच्याकरवी करवून घेतला. त्यामुळे बाल गोपाळातील उत्साही मुला-मुलींनाही चालवून व झोपवून काहीही होत नाही. याची अनुभूती दिली. कार्यक्रमाचे अंतीम चरणात सर्व दाखविलेल्या चमत्काराचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याबरोबरच शंकानिरसनही करण्यात आले. तसेच भावी काळात याप्रकारच्या दैवी चमत्कारांना फसणार नाही. याची खुणगाठ मनाशी बांधण्याचे आवाहनही करण्यात आले. सर्वांना समाजहिताच्या पाच प्रतिज्ञा देण्यात आल्या. संयोजक राजेंद्र शेडगे यांनी आभारप्रदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमास जि.प. शाळा गांजे केंद्राचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व सर्व शाळांचे मुख्यध्यापक, शिक्षिका -शिक्षकवृंद, बालचमू मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. बहुसंख्य मुलां-मुलींना खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून व्यवसायीक व व्यापारी बनण्याचा आनंद व अनुभव घेतला. त्यास पालकवर्ग व उपस्थितांनी प्रतिसाद दिला.