कास तलाव परिसरातील हरित वैभवासाठी 10 हजार वृक्षांची मोहीम; 30 ऑगस्टला 500 रोपांनी प्रारंभ

by Team Satara Today | published on : 24 August 2026


 सातारा : कास तलाव परिसरातील निसर्गसंपदा आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी जनसेवा फाउंडेशन आणि कर्तव्य सोशल ग्रुपने व्यापक वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. कास परिसरात आगामी काळात तब्बल 10 हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता 500 रोपांच्या लागवडीने होणार आहे.

या मोहिमेचे उद्घाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्ष वेदांतिका भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

उपक्रमाची माहिती देताना जनसेवा फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अभिजीत देशपांडे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. अभय टोणपे, डॉ. जाकिर इनामदार आणि डॉ. रमाकांत साठे यांनी कास परिसराच्या पर्यावरणीय संवर्धनाची गरज अधोरेखित केली. कर्तव्य सोशल ग्रुपचे दीपक भोसले, विलास कासार आणि मधुकर पवार यावेळी उपस्थित होते.

डॉ. देवेंद्र पाटील या उपक्रमाची माहिती देताना पुढे म्हणाले जनसेवा संघटना आणि कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने तलाव परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागा, नगरपालिका मालकीच्या जागा तसेच धरणाच्या भिंतीलगतच्या परिसरात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. कासच्या स्थानिक हवामानाला आणि नैसर्गिक अधिवासाला अनुरूप प्रजातींची निवड केली जाणार आहे.

विशेष म्हणजे केवळ रोपे लावण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांच्या देखभाल व संगोपनाची जबाबदारीही घेण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्थांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

कासचे नैसर्गिक सौंदर्य, पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधता टिकवण्यासाठी ही मोहीम दीर्घकालीन हरित चळवळीचे रूप घेणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद सण उत्साहात आणि सामाजिक सलोखा ठेवून पार पाडावेत - जिल्हाधिकारी संतोष पाटील, शांतता समितीच्या बैठकीत आवाहन
पुढील बातमी
फलटणमध्ये गांजा विक्रीचा पर्दाफाश; आणखी दोघे जेरबंद, तीन आरोपींकडून ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त

संबंधित बातम्या