ढेबेवाडी : शाळेत शिकत असताना खांद्यावर स्टार लागलेले खाकी वर्दीतील पोलिस अधिकारी दिसले, की त्यांचा खूप अभिमान वाटायचा. आपणही त्यांच्यासारखे समाजात मानसन्मान आदर असलेला गर्दीतला वर्दीवाला बनावे, असे सारखे वाटायचे. मात्र, पुढे हे स्वप्न स्वप्नच न ठेवता त्याचा पाठलाग करत राहिलो. तब्बल चौदा - चौदा तास अभ्यास केला आणि ध्येय गाठलेच. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलेला मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील शुभम भास्करराव पाटील सांगत होता.
शुभम हा निवृत्त कृषी अधिकारी भास्करराव पाटील, शर्मिला पाटील यांचा सुपुत्र, तर माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदुराव पाटील, माजी सभापती मधुकर पाटील यांचा पुतण्या आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या शुभमने बीटेक ॲग्रीकल्चरची पदवी संपादन केली आहे. शालेय शिक्षण घेत असताना शुभमने पोलिस अधिकारी बनायचे केवळ स्वप्न पाहिले नाही तर ते पूर्णत्वास नेले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा वेग वाढवला. अशा प्रकारची तयारी करत असलेल्या काही मित्रांचा ग्रुप तयार केला. सुरुवातीला आठ - आठ तास आणि नंतर चौदा - पंधरा तास लायब्ररीत बसून त्याने अभ्यास केला. मोबाईलमधील व्हॉटसॲप, फेसबुक आदी बाबीचा वापरच थांबविला. उमेश कुदळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वडील नोकरीला असल्याने घरी आई शर्मिला, तसेच, बहीण वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितिजा यांनीही त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. अलीकडे शुभमने सरळ सेवेतून सांख्यिकी अन्वेषक आणि कर निर्धारण अधिकारीपदाला गवसणी घातली होती; परंतु पोलिस अधिकारी बनायचे स्वप्न त्याला स्वस्थ बसून देत नव्हते. अखेर त्याने हे ध्येय गाठलेच. या यशाबद्दल विविध स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
स्वप्नाला सत्यात उतरण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही. ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे. स्वप्न पूर्ण झाल्याचा मोठा आनंद आहे. मात्र, पुढे पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे.
- शुभम पाटील, पोलिस उपनिरीक्षक