जिल्हा बँकेच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका; शिवेंद्रसिंहराजेंचा स्वपक्षीय जयकुमार गोरेंना सूचक इशारा

‘मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाबाहेर गेलो नाही’; जागांचा त्याग करूनही संशयाच्या भोवऱ्यात का? जयकुमार गोरेंच्या विधानानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी मांडली रोखठोक बाजू

by Team Satara Today | published on : 18 November 2026


सातारा : ​सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तांतरानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, यशाचे श्रेय घ्यायचे आणि अपयशाची वेळ आली की दुसऱ्यांकडे बोट दाखवायचे ही भूमिका योग्य नसल्याचा सूचक इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दिला आहे.
​जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपला सत्तेबाहेर राहावे लागल्यानंतर या राजकीय घडामोडींची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे राजकारण सुरू झाले आहे. निवड प्रक्रियेबाबत विचारणा केल्यास शिवेंद्रसिंहराजेंनाच विचारा, अशी भूमिका जयकुमार गोरे यांनी घेतल्याने भाजपमधील समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना आपली बाजू सविस्तरपणे मांडली. जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या वतीने आपल्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती; मात्र या संपूर्ण प्रक्रियेत आपण एकट्याने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. प्रत्येक महत्त्वाच्या बैठकीला धैर्यशील कदम यांना सोबत ठेवण्यात आले होते आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका लक्षात घेऊनच सर्व राजकीय हालचाली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय हाच आपल्यासाठी अंतिम होता आणि त्यापलीकडे जाऊन कोणाशीही स्वतंत्र चर्चा अथवा तडजोड केलेली नाही, असा दावा शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. सातारा आणि जावळी तालुक्यांतील सुमारे साडेचारशे मतांचे राजकीय महत्त्व लक्षात घेता या भागातील उमेदवारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेख करत, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा शब्द पाळण्यासाठी आपण काही जागांवर त्यागाची भूमिका स्वीकारल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांपर्यंत भाजपची भूमिका पोहोचवण्याचे कामही प्रामाणिकपणे केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी सकाळीदेखील वरिष्ठांचा निरोप मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला होता; मात्र त्यानंतरही अपेक्षित राजकीय निर्णय झाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
​निवड प्रक्रियेतील घडामोडींबाबत जयकुमार गोरे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना शिवेंद्रसिंहराजे यांनी नाराजी लपवून ठेवली नाही. ‘झाले तर आमच्यामुळे आणि नाही झाले तर शिवेंद्रसिंहराजेंना विचारा, अशी भूमिका योग्य नाही,’ असे सांगत गोरेंची नाराजी नेमकी कशामुळे आहे याचे उत्तर त्यांनाच विचारावे, असा टोला त्यांनी लगावला. पक्षासाठी काम करताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला प्राधान्य देताना आपण कधीही अटी घातल्या नाहीत आणि पक्षाच्या आदेशानुसार जागांचा त्यागही केला. त्यामुळे निवडणुकीतील घडामोडींचे श्रेय घेण्याची वेळ आली की पुढे येणे आणि अपेक्षित निकाल न लागल्यास जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलणे, हा प्रकार खटकणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शांत राहून काम केले तर अनेक गोष्टी साध्य होतात; मात्र प्रत्येक वेळी बोलत राहिल्याने काहीच साध्य होत नाही, असे म्हणत त्यांनी राजकीय सहकाऱ्यांना संयमाचा सल्ला दिला.
​दरम्यान, जिल्हा बँकेच्या कारभारात काही त्रुटी किंवा चुकीच्या बाबी असतील, तर संचालकांनी त्याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे; मात्र संस्थेचा वापर केवळ राजकीय संघर्षासाठी होऊ नये, अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली. सहकारी बँकेच्या हितापेक्षा राजकीय प्रतिष्ठेचे विषय मोठे केले जात असतील तर ते योग्य नाही, असेही त्यांनी सुनावले. जिल्हा बँकेतील या सत्तांतरानंतर भाजपमधील अंतर्गत समन्वय, महायुतीतील निर्णयप्रक्रिया आणि स्थानिक नेत्यांमधील परस्पर विश्वासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शिवेंद्रसिंहराजेंच्या या भूमिकेनंतर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर; उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची निवड

संबंधित बातम्या