सातारा : सातारा तालुक्यातील वडूथ येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जनगणना आणि एसआयआर अंतर्गत मतदारांचे मॅपिंग तसेच या अनुषंगाने करायच्या पुढील कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जनगणनेच्या कामाबाबत बोलताना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी स्पष्ट केले की, घरोघरी जाऊन केली जाणारी घरांची गणना अत्यंत अचूक आणि निश्चित केलेल्या मुदतीतच पूर्ण झाली पाहिजे. सर्व पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन या सर्व बाबींची काटेकोरपणे पडताळणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
एसआयआर प्रक्रियेचा आढावा घेताना जिल्हाध्यक्ष पाटील श्री. म्हणाले, ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे, अशा राहिलेल्या सर्व व्यक्तींचे मॅपिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. मतदार मॅपिंगचा वेग आणि टक्का वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
जनगणना आणि मतदार मॅपिंग ही अत्यंत महत्त्वाची व राष्ट्रीय स्तरावरील कामे आहेत. त्यामुळे सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करून हे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे.