परळी : परळी येथील प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिरास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजूभैय्या भोसले यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या अधिसूचनेमुळे या मंदिराचा जिर्णोद्धार तसेच हा परिसर सुशोभीत होणार आहे.
ना. शिवेंद्रराजे भोसले व माजी जिल्हा परिषद सदस्य राजूभैय्या भोसले हे गेल्या कित्येक वर्षांपासून या मंदिराचा कायापालट तसेच मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी पुरातत्त्व विभाग तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत होते. परळी येथील महादेव मंदिर हे इसवी सन 13/ 14 व्या शतकातील असून सदर मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ व सभामंडळ अशी आहे. गर्भगृह हे चार अर्ध स्तंभावर आहे. प्रवेशद्वारावर तीन शाखा असून पहिली शाखा पद्मपत्र व विविध प्राण्यांच्या नक्षीने कोरलेली आहे.
दुसरी स्तंभ शाखा असून तिसरी बहुमितिक नक्षी असलेली शाखा आहे. ललाट बिंबावर गणेश मूर्ती असून उत्तरंग शिळेवर भौमितिक नक्षी आहे. सभामंडळ 16 स्तंभावर असून त्यापैकी चार पूर्ण स्तंभ आहेत. मंदिरासमोर एक मानस्तंभ आहे. येथील एकूण एक हेक्टर 61 आर क्षेत्र संरक्षित करण्यासाठी स्मारकाचे क्षेत्रफळ म्हणून आखण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे मंदिर ग्रामपंचायत परळी अंतर्गत श्री केदारेश्वर देव ट्रस्ट पहात आहे. या परिसरात अतिशय दुर्मिळ अशा वीरगळी असून सती शिळा आहेत. मात्र त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ट्रस्टचा निधी कमी पडत असल्याने येथील जिर्णोद्धार विकास ठप्प झाला आहे. हे शिवमंदिर अद्वितीय स्थापत्य रचना असलेले असे मंदिर आहे. महादेव मंदिराच्या स्तंभावर सुंदर कोरीव काम केले असून एका स्तंभावर आभासी शिल्प ही कोरले आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवपिंड आणि अत्यंत सुंदर परंतु भग्न असलेली महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे.
परळी येथील प्राचीन महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार तसेच शेजारी असलेले पुष्करणी तलाव हा परिसर भाविक पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. राज्यभरातून शिवभक्त परळी येथे दर्शनासाठी येतील यात शंका नाही. - ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री