संजय शेलार खून प्रकरणातील पाच संशयित जेरबंद

न्यायालयाने संबंधितांना सुनावली सात दिवसांची पोलीस कोठडी

सातारा : सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात चर्चिल्या गेलेल्या संजय शेलार खून प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अरुण बाजीराव कापसे रा. माळ्याची वाडी ता. सातारा, रामचंद्र तुकाराम दुबळे रा. मतकर कॉलनी शाहूपुरी सातारा, विकास अवधूत सावंत रा. मोळाचा ओढा सातारा, अजिंक्य विजय गवळी रा. शनिवार पेठ मिरज ता. मिरज जि. सांगली, प्रशांत मधुकर शिंत्रे रा. बेळंकी ता. मिरज जि. सांगली अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 जानेवारी रोजी मेढा पोलीस स्टेशन हद्दीत संजय गणपत शेलार रा. अंधारी, ता. जावली, जि. सातारा यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर दि. 15 रोजी मयताची पत्नी हिने मेढा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता.

तपासाच्या अनुषंगाने तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून संजय शेलार याचा खून करणारा रामचंद्र तुकाराम दुबळे याला दि. 16 रोजी अटक केली. पोलीस कोठडीत असताना दुबळे याने अरुण बाजीराव कापसे यांच्या सांगण्यावरून संजय शेलार चा खून केल्याचे सांगितले. संजय शेलार याचा खून करण्यासाठी अरुण कापसे, रामचंद्र दुबळे आणि विकास सावंत यांनी मिळून खुनाचा कट रचला होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. दि. 18 रोजी विकास अवधूत सावंत रा. आगलावेवाडी, ता. जावली, जि. सातारा यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला असता त्यांनी तात्काळ चार पोलीस पथके नेमून गन्ह्यातील मुख्य आरोपी अरुण कापसे याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेवून त्यास मिरज येथून अटक केली आहे. तसेच अरुण कापसे यास पळून जाण्यासाठी मदत करणारा अजिंक्य गवळी आणि लपण्यासाठी आश्रय देणारा प्रशांत शिंत्रे यांनाही अटक करण्यात आली आहे. संबंधितांना मेढा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 28 जानेवारी पर्यंत म्हणजेच सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक पांगारे, शिंगाडे, सुधीर वाळुंज तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथक, मेढा व वाई पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा अधिक तपास सातारचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करीत आहेत.



मागील बातमी
बेकायदा बांधकामप्रकरणी आत्मदहनाचा इशारा
पुढील बातमी
देगाव फाटा परीसरात 11 हजारांची घरफोडी

संबंधित बातम्या