सातारा : रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य, संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे संस्थापक सदस्य,भारत स्काऊट गाईडचे राष्ट्रपती पदक विजेते प्राचार्य अण्णासाहेब होवाळे यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी सोमवारी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी निधन झाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी होवाळे हॉस्पिटल येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले व त्यानंतर माहुली येथील कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहीनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक मान्यवर व्यक्ती व विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधींनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.अस्थीविसर्जन, पुण्यानुमोदन -शोकसभा बुधवारी घेण्यात आली आहे.
त्यांच्या पाठीमागे मुलगा प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ.सुबोध, स्त्रीरोगतज्ञ स्नुषा डॉ. मृणालिनी, मुली डॉ.स्वाती गायकवाड व डॉ. प्रज्ञा मुनतोडे, जावई प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. संजय गायकवाड (सोलापूर) व डॉ. प्रमोद मुनतोडे (पुणे) आणि नातू डॉ. आदित्य व इंजिनीयर तन्मय असा परिवार आहे.
प्राचार्य अण्णासाहेब होवाळे यांचा जन्म ९ जानेवारी १९३६ रोजी सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथे झाला. मुंबई येथील सचिवालयात काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी रयत सेवक म्हणून आयुष्यभर काम केले. संस्थेच्या पाचवड येथील महाविद्यालयातून १९९४ साली निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कामाला वाहून घेतले. डॉ. बाबासाहेबआंबेडकर अकादमीचे विश्वस्त, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सातारा शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. स्काऊट गाईड चे जिल्हा आयुक्त म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचा जीवनगौरव पुरस्कार तसेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते दिल्ली येथे भारत स्काऊट गाईडचा सिल्वर एलिफंट अवॉर्डने त्यांना गौरविण्यात आले आहे. प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ दिवंगत डॉ. सुधा होवाळे यांच्याशी त्यांचा विवाह रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये संस्थेचे माजी चेअरमन भाऊसाहेब नलावडे, प्राचार्य बापूसाहेब उनउने,जॉइंट सेक्रेटरी एच.डी. महादार व बा. म.ठोके यांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने झाला.
संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य अण्णासाहेब होवाळे यांचे निधन
by Team Satara Today | published on : 09 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा