सातारा : शिरूर तालुक्यातील मौजे तुळापूर (बलिदान स्थळ) व वढू बुद्रुक (समाधी स्थळ) येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या विकास आराखड्यातील वाढीव कामांसह राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासन निर्णयान्वये मान्यता दिलेल्या रुपये 282.24 कोटी किमतीच्या सुधारीत वविकास आराखडयामध्ये आता रुपये 247.63 कोटी इतकी वाढ होऊन एकूण रुपये 529.87 कोटी किमतीच्या सुधारीत आराखडयास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.
काही दिवसांपूर्वीच ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी वढू- तुळापूर येथे भेट देवून पाहणी केली होती. त्यानंतर विविध कामे करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून सदर कामे मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. फडणवीस यांनी सदर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री महोदय आणि राज्य सरकारचे विशेष आभार मानले आहेत.
मूळ आराखड्यात सुधारणा करताना विविध पायाभूत सुविधा व अतिरिक्त कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन सुधारित आराखड्याची एकूण किंमत तब्बल ५२९.८७ कोटी रुपये इतकी झाली आहे. यामध्ये भीमा नदीवरील आपटी येथे पूल बांधकाम, रस्त्यांचे रुंदीकरण तसेच इतर पूरक सुविधांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर रस्ता विकास, पूल, सांस्कृतिक ध्वज उभारणी, भूसंपादन यांसारख्या घटकांचे सादरीकरण करण्यात आले होते.
सुधारित आराखड्यानुसार आपटी ते वढू बुद्रुक रस्ता विकासासाठी सुमारे ७३ कोटी रुपये, १८ मीटर रुंदीचा पूल, ४५ कोटींचा व्ह्यूइंग डेक, ३० मीटर उंच भगवा ध्वज, पथदिवे, युटिलिटी शिफ्टिंग तसेच भूसंपादनासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. एकूण सुमारे २३७ कोटी ६३ लाख रुपयांच्या कामांना स्मारकाच्या मुख्य घटकांत मान्यता देण्यात आली आहे.
हा प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून आपटी ते तुळापूर दरम्यान ग्रीनफिल्ड रस्ता विकसित केला जाणार आहे. तसेच पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने स्थानिकांना गाईड प्रशिक्षण, गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधा उभारण्यावरही भर देण्यात येणार आहे.