केळघर : गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित राहिला नसून जगभरात जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे, तिथे तिथे त्यांनी हा उत्सव साजरा केला आहे. नोकरी व्यवसायानिमित्त इंग्लंडमधील लंडन येथे स्थायिक असलेले केळघर (ता. जावळी) येथील सुपुत्र गणेश वसंतराव गाडवे यांनी समुद्रापार मराठमोळ्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना केली आहे. यातून मराठमोळी संस्कृती जपण्याचा प्रयत्न त्यांनी परदेशातही केला आहे.
येथील गणेश गाडवे गेल्या दहा वर्षांपासून पत्नी मोनिका यांच्यासह दर वर्षी विविध अभिनव देखावे गणेशोत्सवात साकारत आहेत. लंडनमध्ये स्थायिक असलेले गणेश गाडवे व अर्जुन जाधव यांनी एकत्र येत गणेशाची स्थापना केली आहे. या वर्षी त्यांनी उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. यामध्ये गौरी कुंड ते केदारनाथ मंदिर हा कठीण असलेला रस्ता या देखाव्यातून दाखवला आहे.
लंडनमध्ये स्थायिक असलेली मराठी कुटुंबे रोज गणपतीच्या आरतीसाठी येतात. जवळपास ५० भारतीय नागरिक आरतीसाठी येत असल्याचे गणेश यांनी सांगितले. आरती झाल्यानंतर महाप्रसादही दिला जातो. लंडनमधील मराठी कुटुंबे गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देत आहेत.
आपल्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असलो, तरी मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला गणेशोत्सव आम्ही थाटामाटात इंग्लंडमध्ये उत्साहाने साजरा करत असल्याचे गणेश गाडवे, मोनिका गाडवे, अर्जुन जाधव, वैशाली जाधव यांनी सांगितले.