खेड येथे दुचाकीस्वाराला दांडक्याने मारहाण; दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 October 2026


सातारा : रस्त्यावरून गाडी चालविण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीस्वाराला लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना खेड येथे घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल भीमराव चव्हाण (वय 32, रा. कृष्णानगर, खेड, ता. सातारा) हे 18 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकी (क्र. एमएच 11 एव्ही 5069) घेऊन मित्राकडे जात होते. त्यावेळी स्वप्निल बंगल्यापासून काही अंतर पुढे रस्त्यावर महिंद्रा एक्सयूव्ही घेऊन आलेल्या चालकाने रस्त्याच्या मध्यभागी वाहन उभे केल्याने चव्हाण यांना पुढे जाण्यास जागा मिळाली नाही.
यावरून झालेल्या वादातून संबंधित चालकाने चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर आणि उजव्या हातावर मारून दुखापत केली. यावेळी शिवीगाळ करून दमदाटीही करण्यात आली. संबंधित चालकाच्या मित्रानेही ओम्नी गाडीमधून येऊन चव्हाण यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी अतुल चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम कदम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, रा. खेड, ता.  सातारा) आणि ओम्नी कारवरील अज्ञात चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोवई नाका परिसरात जुन्या भांडणातून कोयत्याने हल्ला; दोघे जखमी, चौघांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
फलटणमध्ये भडकमकरनगर परिसरात सात लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या