राजौरी: मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राजौरी जिल्ह्यात रात्री उशिरा झालेल्या जोरदार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच पावसाने जोर पकडला आहे. यामुळे दरहाल नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून जिल्ह्यातील सखल भागात पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने वाहने वाहून गेली आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील काही तासात जम्मू-काश्मीर आणि इतर डोंगराळ भागात आणखी मुसळधार पाऊस लागण्याची शक्यता आहे. परिणामी, माता वैष्णो देवी आणि अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत.
राजौरीमध्ये रात्री १ ते सकाळी ६ या वेळेत मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर झालेल्या या जोरदार पावसामुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरहाल नदीच्या पुराच्या पाण्याने राजौरीच्या बेला भागात हाहाकार माजवला असून, तेथील स्थानिक उद्यान आणि बस स्थानकाचे नुकसान झाले आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे समजते.
बस स्थानकाच्या पार्किंगमधून वाहने वाहून गेली
राजौरीमधील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, अनेक वाहने वाहून गेली आहेत आणि उर्वरित वाहने बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने जेसीबी उपलब्ध करून द्यावीत. ते म्हणाले, "पुरापूर्वी येथे किमान ३००-४०० वाहने उभी होती आणि ती सर्व रातोरात वाहून गेली. आम्ही प्रशासनाला कळकळीची विनंती करतो की, जी वाहने अजूनही तिथे आहेत ती बाहेर काढण्यासाठी जेसीबी किंवा क्रेन पाठवाव्यात. या कठीण काळात प्रशासनाने लोकांना मदत करावी. पुराची परिस्थिती गंभीर आहे आणि पाऊस अजूनही थांबलेला नाही."