सातारा : येत्या बुधवार दि. १२ मार्चपासून बोर्डाची सुरू होणारी बारावीच्या माहिती तंत्रज्ञान(आय टी) व सामान्य ज्ञान (जीके) विषयांची ऑनलाईन परीक्षाही गैरप्रकारमुक्त करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने क्षेत्रीय अधिकारी आणि केंद्रसंचालकांना सक्त ताकीद दिली आहे. ऑनलाइन परीक्षा आयोजित केलेल्या सर्व संगणक प्रयोगशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले असून लेखी परीक्षेप्रमाणेच प्रत्येक केंद्रासाठी बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती जिल्हास्तरावरून करण्याच्याही सूचना जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
बोर्डाची बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असून दि. ११ मार्च रोजी लेखी परीक्षा (तुरळक विषय वगळता) संपत आहे. त्यानंतर दि. १२ ते १८ मार्च या कालावधीत माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. कोल्हापूर व कोकण विभागात या ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची निश्चिती झाली असून ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना आयटी विषय मान्यता देण्यात आली आहे, त्याच कनिष्ठ महाविद्यालयात (काही अपवाद वगळता) परीक्षा केंद्र असणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या खाजगी सैनिकी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची ऑनलाईन परीक्षाही ज्या त्या सैनिकी शाळेतच होणार आहे. कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात प्रत्येकी एक खाजगी सैनिकी शाळा आहे.
सर्व क्षेत्रीय अधिकारी, केंद्र संचालक, आयटी शिक्षक पर्यवेक्षक यांना विभागीय मंडळाने परीक्षेबाबत ऑनलाईन प्रशिक्षण दिले असून या सर्वांसह विद्यार्थ्यांसाठी माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.
इंग्रजी, जलसुरक्षा आणि पर्यावरण शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे तीन अनिवार्य विषय वगळता इतर विषयांकरिता वैकल्पिक विषय म्हणून कला, वाणिज्य व शास्त्र या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (आय टी) हा विषय घेता येतो. कोल्हापूर विभागीय मंडळातील बारावीच्या २५,१७९ विद्यार्थ्यांनी तर कोकण विभागीय मंडळातील ४,८०३विद्यार्थ्यांनी हा वैकल्पिक विषय घेतलेला आहे. कोल्हापूर मंडळात २२४ तर कोकण मंडळात ७० परीक्षा केंद्रांवर या विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तर कोल्हापूर विभागातील तिन्ही सैनिकी शाळेतील बारावीच्या एकूण ८८ व कोकण मंडळातील दोन सैनिकी शाळेतील ७० विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची परीक्षा होणार आहे.
असे आहे वेळापत्रक -
माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा दि. १२, १५ व १७ मार्च रोजी सकाळी ११ ते १:३० आणि दुपारी ३:०० ते ५:३० या वेळेत बॅचनुसार होणार आहे. तर सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा दि. १५, १७ व १८ मार्च रोजी सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत बॅच नुसार होणार आहे. लेखी परीक्षेप्रमाणे याही परीक्षेत दहा मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति तास २० मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. विहित वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर परीक्षेच्या संगणक प्रयोगशाळेत अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
असे आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप-
माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा अडीच तासांची व ८० गुणांची असून त्यात रिकाम्या जागा, चूक की बरोबर, बहुपर्यायी एक उत्तर बरोबर, दोन उत्तरे बरोबर, तीन उत्तरे बरोबर, जोड्या लावा, लघुत्तरी प्रश्न आणि एचटीएमएल कोड व प्रोग्रॅम लिहिणे असे प्रश्न असतील. २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा यापूर्वीच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर झालेली आहे.
तर सैनिकी शाळांमधील सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा २ तासांची १०० गुणांची आहे. या परीक्षेत शंभर प्रश्न असतील.
अशी आहेत जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे -
माहिती तंत्रज्ञान विषयाकरता सातारा ७१, सांगली ५३, कोल्हापूर १०० अशी कोल्हापूर विभागात एकूण २२४ तर कोकण मंडळात रत्नागिरी ४६, सिंधुदुर्ग २४ अशी एकूण ७० परीक्षा केंद्र आहेत. तर या पाचही जिल्ह्यात सामान्य ज्ञान विषयासाठी सैनिकी शाळेत प्रत्येकी एक परीक्षा केंद्र आहे.
माहिती तंत्रज्ञान विषयाकरिता सातारा 8,360 सांगली 4,351 कोल्हापूर 12,468 असे कोल्हापूर विभागात 25,179 परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत. कोकण मंडळात रत्नागिरी 2,904 सिंधुदुर्ग 1,899 असे 4,803 परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत.
सामान्य ज्ञान विषयाकरता सातारा केवळ ५,सांगली 23, कोल्हापूर 60, रत्नागिरी 34 आणि सिंधुदुर्ग 36 असे परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत.
गैरप्रकार करणाऱ्यांना इशारा -
माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा घेत असताना शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा धोरणाचा अवलंब काटेकोरपणे इतर विषयाच्या परीक्षेप्रमाणेच करावयाचा आहे. परीक्षा काळात सदर धोरणाचा अवलंब न केल्यास व विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयावर तसेच परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक व शिपाई या सर्वांवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवा व शर्ती) नियमावली 1981 नुसार व माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act 2000) नुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रावर आवश्यकतेनुसार केंद्र संचालक व आयटी टीचर यांना मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र परीक्षार्थी, पर्यवेक्षक, शिपाई यांना मोबाईल किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास व बाळगण्यास मनाई आहे.
पर्यवेक्षक हे संगणक साक्षर असतील, मात्र ते माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक शिकवणारे शिक्षक नसतील. आयटी शिक्षकांना केवळ तांत्रिक मदतीसाठीच संगणक कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांची परीक्षापूर्व तपासणी करण्याच्या सूचना विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच परीक्षेपूर्वी वीज पुरवठा, इंटरनेट कनेक्शन व गती याबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दि. १० मार्च रोजी सर्व परीक्षा केंद्रांवर चाचणी (ड्राय रन) घेण्यात येणार आहे.
विभागीय व जिल्हा समन्वयकांची नियुक्ती -
तांत्रिक मदतीसाठी कोल्हापूर विभागीय समन्वयक म्हणून सुषमा पाटील तर कोकण विभागीय समन्वयक म्हणून सचिन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय आयटी समन्वयक पुढीलप्रमाणे -
सातारा - विशाल शिंदे, किरण शिंदे, संपत चव्हाण.
सांगली - धनाजी शेवडे, शांतिनाथ पाटील.
कोल्हापूर - बी एम वायकसकर, ज्योती गडगे, निलेश कांबळे.
रत्नागिरी - समृद्धी बावधनकर. सिंधुदुर्ग- प्रसन्नकुमार मयेकर.