सातारा : पुरोगामी आणि कष्टकरी चळवळीने रोजगार, आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण या ऐहीक विषयांबरोबरच किंबहुना त्या पलीकडे जाऊन योग्य त्या अस्मितेची जोड देत आंदोलन केले पाहिजे. त्यासाठी उत्तर भारतीय हिंदी पट्ट्याचे सांस्कृतिक आक्रमण रोखताना दक्षिण आणि पूर्वोत्तर भारतातील सांस्कृतिक वैविध्य याचा आधार घेता येईल. महाराष्ट्राने दख्खनी राजकारण आपलेसे करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. नीरज हातेकर यांनी सातारा येथे बोलताना केले.
परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती, सातारा व राष्ट्रीयता जागर अभियान, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. शेख काका व शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सामाजिक चळवळी पुढील आव्हाने या विषयावर प्रा. डॉ. नीरज हातेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी छ शिवाजी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील होते. विचारमंचावर परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे समन्वयक विजय मांडके होते.
विविधतेने नटलेला भारत विरुद्ध धर्म, वंश, जात या उतरंडीतील भारत असा संघर्ष आहे. असे सांगून प्रा. डॉ. नीरज हातेकर म्हणाले, सध्या राजकारणात धर्माचा प्रभाव हा आपोआप वाढलेला नसून तो नियोजनबद्ध पद्धतीने वाढवला जात आहे. स्वातंत्र्यानंतर सरकारच्या धोरणामुळे मोठे उद्योग, शिक्षणसंस्था, धरणे, संशोधन संस्था निर्माण झाल्या. तसेच बँकांचे राष्ट्रीयीकरण, सार्वजनिक उद्योग व सरकारी नोकरी यामधून एक मध्यमवर्ग उदयास आला. सन 1990 पर्यंत जनतेच्या प्रश्नांविषयी दाद मागण्यासाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करणे हा मार्ग होता. परंतु त्यानंतर खाजगी क्षेत्राचा प्रभाव वाढला आणि मुख्य सेवा तसेच उद्योग त्यांच्या ताब्यात गेले. त्यामुळे सरकारची भूमिका संकुचित झाली.
उदारीकरणानंतर बेरोजगारी, महागाई व स्थानिक प्रश्न याविषयी दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण झाला. कारण उदयास आलेला नवा मध्यमवर्ग हा खाजगी क्षेत्राच्या आधारे तयार झाला होता आणि बहुतांश उद्योग व सेवा या खाजगी क्षेत्राच्या ताब्यात गेल्या होत्या. दरम्यान जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा एक पर्याय मार्ग आकाराला येत होता. ज्यामध्ये राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते यांची एक यंत्रणा निर्माण झाली. असे सांगून प्रा. डॉ. नीरज हातेकर म्हणाले, 1990 नंतर हिंदुत्ववाद्यांचा जोर वाढला. त्याला पुरोगामी म्हणवणार्या पक्ष आणि संघटना यामधील सुप्त हिंदुत्ववाद्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाल्याने चळवळी कमकुवत झाल्या. बेरोजगार आणि गांजलेले यांना अस्मितेची जाणीव करून देत हिंदुत्ववाद्यांनी धर्म, जात व इतिहास यांचा उपयोग केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पॉप्युलिस्ट पॉलिटिक्स तयार केले आहे. हे नरेटिव्ह त्यांनी सेट केले आहे. हिंदूंचा इतिहास आणि मुसलमानांचा इतिहास यात शत्रुत्व निर्माण केले आहे. याचे बरेचसे फायदे ओबीसी संघटनेच्या नेत्यांनी व्यक्तिगतरित्या घेतले आहेत. त्याचा फायदा मात्र ओबीसी समाजाला झालेला नाही, हे वास्तव आह,े असेही प्रा. डॉ. नीरज हातेकर यांनी सांगितले.
अलीकडची सरकारे ही धार्मिक उन्मादाला खतपाणी घालत आहेत. हेच खरंतर सामाजिक चळवळी पुढील मोठे आव्हान आहे, असे सांगून अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटना हीच अस्मिता घेऊन पुढे गेलो तरच सर्व जाती, धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जाता येईल.
प्रारंभी कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा येथील कार्यकर्त्यांनी अभिवादन गीत सादर केले. प्रास्ताविक मीनाज सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन विजय मांडके यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, प्रा. डॉ. तांबोळी, प्रा. डॉ. भास्कर कदम, निलिमा हांडे कदम, किशोर बेडकीहाळ, दिनकर झिंब्रे, राजन कुंभार, जनार्दन घाडगे, एडवोकेट वसंतराव नलावडे, एडवोकेट राजेंद्र गलांडे, कॉ. श्याम चिंचणे, कॉ. माणिक अवघडे, विनायक आफळे, प्रा. विकास यलमार, रफिक शेख, प्रमोद परामणे, दिलीप भोसले, प्रा संजीव बोंडे, नारायण जावलीकर, मच्छिंद्र जाधव, डॉ. दीपक माने, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण आदी बहुसंख्येने उपस्थित होते.