सातारा : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि प्रेमाचा सण. मात्र आपल्या आनंदात समाजातील गरजू बांधवांनाही सहभागी करून घेतल्यास या सणाचा खरा अर्थ अधिक सुंदर होतो, याची जाणीव गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून करून दिली आहे.
गुरुकुल स्कूलचे इयत्ता ४ (राजगुरू) मधील समिहा प्रसाद कुलकर्णी आणि इयत्ता १० (भगतसिंग) मधील मिथिलेश प्रसाद कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने यंदाची दिवाळी सामाजिक बांधिलकी जपत साजरी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी दिवाळीनिमित्त समाजातील गरजू बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला. यावर्षी ६ गरजू मुलांना नवीन कपड्यांचे (ड्रेसचे) वाटप करण्यात आले, तर ५ गरजू कुटुंबांना दिवाळीच्या फराळाचे पदार्थ देऊन त्यांच्या आनंदात सणानिमित्त भर घालण्यात आली.
यानिमित्ताने बोलताना गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले, ईश्वर कृपेने आपल्याला जीवनात अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. मात्र, समाजातील खऱ्या गरजू व्यक्तींसोबत आपल्या उत्पन्नातील काही भाग वाटून घेणे ही केवळ मदत नसून आपली सामाजिक बांधिलकी आहे. हीच भावना मुलांच्या मनात लहानपणापासून रुजावी आणि समाजाचे आपणही काही देणे लागतो, ही जाणीव ठेवून जीवन जगावे. गुरुकुल स्कूलच्या संस्कारमय उपक्रमांतर्गत समिहा कुलकर्णी व मिथलेश कुलकर्णी या दोन्ही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेली ही सामाजिक जबाबदारी उल्लेखनीय, अनुकरणप्रिय व कौतुकास्पद असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
खरे तर मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसते तर त्यांच्या मनात संवेदनशीलता, सहवेदना, दातृत्व आणि माणुसकीची भावना रुजणेही तितकेच महत्त्वाचे असते. स्वतःच्या आनंदासोबत इतरांच्या चेहऱ्यावरही हसू फुलवण्याची शिकवण या छोट्याशा कृतीतून विद्यार्थ्यांना मिळत आहे.
गुरुकुल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, संस्कार आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची शिकवण दिली जाते. या संस्कारांचे प्रतिबिंब समिहा कुलकर्णी आणि मिथिलेश कुलकर्णी या विद्यार्थ्यांच्या कृतीतून दिसून येते. दिवाळीच्या दिव्यांनी घर उजळते; पण दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवला की माणुसकी उजळते!
गुरुकुलची खरी ओळख केवळ गुणवंत विद्यार्थी घडवण्यात नाही, तर संवेदनशील, संस्कारक्षम आणि समाजाचे देणे जाणणारे जबाबदार नागरिक घडवण्यात आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने कौतुक केले.
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी गरजू कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करत फुलवला चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद
मुलांना नवीन कपड्यांचे वाटप; ५ गरजू कुटुंबांना दिवाळीच्या फराळाचे पदार्थ
by Team Satara Today | published on : 04 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा