सातारा : माण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासात विलंब होत असल्याचा आरोप करत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात निवेदन देत, तातडीने योग्य कारवाई न झाल्यास पोलीस कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे
याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी 21 जुलै रोजी शाळेतून घरी परतत असताना श्रीशैल्य मनोहर खाडे रा. पळशी, ता. माण या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेले व तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
याशिवाय, 27 जुलैच्या मध्यरात्री संबंधिताने मुलीच्या घरासमोर येऊन गाडीचा हॉर्न वाजवत अश्लील हावभाव केल्याचा आणि तिचा मानसिक छळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला कोणालाही याची माहिती दिली नव्हती. मात्र नंतर विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार सांगितल्याचे नातेवाईकांनी नमूद केले आहे. त्यानंतर म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून श्रीशैल्य खाडे याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी लवकर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ठोस प्रगती दिसून न आल्याने तपासाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकारी या गुंड प्रवृत्तीच्या या श्रीशैल्य खाडे ला त्याच्यावर असलेल्या अन्य गुन्ह्यांमध्ये अटक करतो, असे म्हणत आहेत. वास्तविक पाहता संबंधिताला तक्रारदारांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्याची अटक करणे गरजेचे आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेऊन निष्पक्ष आणि वेगवान तपास करावा, तसेच संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.