रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांनी पाठवलं समन्स

जयकुमार गोरे विरोधातील प्रकरण भोवणार?

by Team Satara Today | published on : 02 May 2025


सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती आणि अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना शनिवारी (दि. 3 मे) वडूज पोलिसांनी हजर राहण्यासाठी नोटीस बजावले आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात कारस्थान केल्याचा संशय रामराजेंवर असल्याने त्यांना हे नोटीस बजावण्यात आले आहे. 

एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. हे प्रकरण विधानसभेत खूप गाजले. या प्रकरणात नंतर संबंधित महिलाच खंडणी घेताना अटक करण्यात आली. याच प्रकरणात खंडणी मागितल्याच्या आरोपातून एका युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनाही अटक करण्यात आली. 

या प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कारस्थान करून त्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्नात राज्यातील अनेक नेते सामील असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला होता. मंत्री गोरे यांनी दोन दिवसांपूर्वी माझी बदनामी करणारे खरे चेहरे समोर येतील असे म्हटले होते. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाही नोटीस बजावून त्यांना 3 मे रोजी वडूज पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती राहिले आहेत. सध्या ते अजित पवार गटाचे नेते आहेत. लोकसभेला मात्र त्यांनी शरद पवार गटाचे काम केले होते. गेल्या अनेक वर्षात जयकुमार गोरे व रामराजे नाईक निंबाळकर यांचा संघर्ष विकोपाला जाऊन पोहोचला आहे. संबंधित प्रकरणात रामराजे यांचा कितपत संबंध आहे? त्यांची चौकशी होणार का? रामराजे चौकशीला सामोरे जाणार का याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भीमाबाई आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र दिन साजरा
पुढील बातमी
भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज : मुख्यमंत्री फडणवीस

संबंधित बातम्या