सातारा : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळी ट्रक, ट्रॅक्टर व ट्रॉली यांसारख्या वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी विशेष जनजागृती उपक्रम राबविला. अंजिक्यतारा सहकारी साखर कारखाना परिसरात आयोजित या उपक्रमात वाहनचालक व मालकांना रिफ्लेक्टरचे महत्त्व आणि सुरक्षित वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवाजी मोहिते आणि शेती अधिकारी विलासराव पाटील उपस्थित होते. पोलिसांनी कारखान्यातील ट्रॉलीचालक व मालकांशी संवाद साधून वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची आवश्यकता स्पष्ट केली. आगामी काळात कारखान्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आणि ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावूनच वाहतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांची मागील बाजू तसेच त्यांची उपस्थिती अन्य वाहनचालकांच्या लक्षात येण्यासाठी रिफ्लेक्टर उपयुक्त ठरतात. त्यामुळे संभाव्य धडक टाळण्यास मदत होते, असे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय वाहन चालविताना मद्यपान करू नये, विनाकारण मोठ्या आवाजात हॉर्न वाजवू नये आणि रहदारीच्या ठिकाणी वाहने पार्क करू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला.
ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावण्याबाबत सातारा तालुका पोलिसांकडून जनजागृती उपक्रम; सुरक्षित वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा