दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह खासदार, आमदार आणि इतर असे भाजपचे जवळपास ७० नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे. त्यासाठी या सर्व नेत्यांना आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व नेते आणि आमदार, खासदारांना जेवणासाठी निमंत्रित केले आहे. सायंकाळी ७.३० वाजता ही भेट होणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ७,१२१ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात देशात ३०६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (१० जून) देशात कोरोनामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर केरळामध्ये ३, तर कर्नाटकामध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला.
गेल्या २४ तासांत सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत. केरळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २२२३ वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ गुजरातचा क्रमांक असून, येथील रुग्णसंख्याही १२२३ इतकी झाली आहे.