सातारा : कोणाला आई नाही तर कोणाला वडील नाहीत. कोणाची आई धुणीभांड्यांचे काम करते, तर कोणाची आई कपड्यांच्या दुकानात कामाला जाते. कोणाचे वडील शेतमजूर आहेत. घरची ही परिस्थिती मुलींच्या शिक्षणाच्या आड येऊ नये, म्हणून रा. ब. काळे शाळेतील २२ गरीब, गरजू मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी थेट शाळेने उचलली आहे. या २२ मुलींना शाळेने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
शाळेतील अनेक मुली गरिबा घरच्या आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात हे लक्षात घेऊन त्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी, यासाठी मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनी या गरजू मुलींच्या शिक्षणासाठी ''आय सपोर्ट'' ही अभिनव योजना सुरू केली. या विद्यार्थिनींना लागणारे वही, पेन, पेन्सिल, गणवेश सर्व काही शाळेतून मोफत मिळणार आहे. पालक, माजी विद्यार्थी, हितचिंतक यांचा या योजनेला उत्तम सहकार्य मिळत असून, ते या योजनेस मदत करतात. त्यातून मुलींच्या शिक्षणासाठी लागणारे सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य शाळेत उपलब्ध झाले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था सुरू केली. या संस्थेतून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. हजारो गरीब कुटुंबातील मुले संस्थेत शिकली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा संस्थेतील शिक्षक पुढे नेत आहेत. मुख्याध्यापक कोळेकर यांनी शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थिनींचा शोध घेतला.
‘आय सपोर्ट’ योजनेला प्रतिसाद
शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या २२ मुलींना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी शाळेतील पालक, माजी विद्यार्थी, तसेच हितचिंतक यांना मदतीचे आवाहन केले. याला भरभरून प्रतिसाद मिळाला. माजी विद्यार्थी स्वप्नील बनकर याने या योजनेसाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे माजी सदस्य चंद्रकांत जडगे यांनीही पाच हजार रुपयांची देणगी दिली. ''आय सपोर्ट'' या नावाने ही योजना सुरू केली आहे. या २२ मुलींनी सातवी उत्तीर्ण होईपर्यंत एक पेनही विकत घ्यायचा नाही. या उपक्रमात माधुरी भोईटे, आशा वाघमोडे, वर्षा भोसले, ज्योती ढमाळ, विजय माने, शीतल सुतार, श्वेता शिंदे हे शिक्षक सहभागी झाले आहेत.
रा. ब. काळे विद्यालयात अनेक मुली कष्टकऱ्यांच्या आहेत. या मुलींना थोडी मदत व्हावी, म्हणून वही, पेन, पेन्सिल इत्यादी साहित्य विकत न घेता सर्व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच मोफत मिळेल, अशी व्यवस्था केली आहे, तसेच या मुलींना शिक्षणासाठी पूर्ण सहकार्य केले जात आहे.
- अमोल कोळेकर, मुख्याध्यापक