खंबाटकीच्या दुसऱ्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा - मंत्री नितीन गडकरी; खंबाटकी घाटातील दुसऱ्या बोगद्याची केली पाहणी

by Team Satara Today | published on : 17 May 2026


सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील दुसऱ्या बोगद्याची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि प्रकल्प यंत्रणेला कामाचा वेग वाढवून पुण्याकडून साताऱ्याकडे येणारी वाहतूक लवकरात लवकर या नव्या बोगद्यातून सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

किसन वीर सहकारी साखर कारखान्यातर्फे दिला जाणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार स्वीकारून पुण्याच्या दिशेने जात असताना ना. गडकरी यांनी खंबाटकी बोगद्यातील दुसऱ्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी ना. गडकरी यांचे सहायक बी. डी. ठेंग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम, मॅनेजर अंकित यादव, सत्यजित निंबाळकर यांच्याकडून त्यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली.

बोगद्याचे काम हिवाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावे, यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. बोगद्यामुळे पुणे-सातारा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पुणे-सातारा महामार्गाच्या नवीन डीपीआरबाबतही त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे छोटे अंडरपास तोडून नव्याने नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. रस्त्यावरील पाणी साचण्याच्या समस्येमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भविष्यातील नियोजन करताना अशा त्रुटी टाळण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बोगद्याच्या परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एआय आधारित माहिती फलक उभारण्याच्या सूचनाही ना. गडकरी यांनी केल्या. तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करणारे स्पष्ट सूचना फलक, सुरक्षा सूचना आणि दिशादर्शक बोर्ड लावण्यावर त्यांनी भर दिला.

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवास सुखदायक, सुरक्षित आणि तणावरहित वाटला पाहिजे, यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. खंबाटकी घाटातील बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळही वाचणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तरडगाव परिसरात वादळ आणि वाऱ्यामुळे मोठे नुकसान; भैरवनाथ गोपालन संस्थेच्या गोशाळेचे पत्रे उडाले
पुढील बातमी
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण; पाचगणी पोलिसांकडून अवघ्या 24 तासांत उलगडा करत संशयिताला अटक

संबंधित बातम्या