चोरांबे गावास तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पुरस्कार

by Team Satara Today | published on : 30 April 2025


सातारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत चोरांबे (ता. जावळी) गावास मिळाला. सहा लाख रुपये व प्रमाणपत्र देऊन गावास गौरविण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत सुपने (ता. कराड) चार लाख रुपये, तृतीय पुरस्कार अंभेरी (ता. खटाव) तीन लाख रुपये जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्रदिनी (ता. १) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

गावांची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना दृश्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून देणे, ग्रामीण जनतेत स्वच्छताविषयक बदल घडवून आणणे या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्ह्यात राबवले जात आहे. स्वच्छता अभियानातील प्रथम तीन ग्रामपंचायती व विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे गौरविण्यात येणार आहे.

हजारमाची, बेलोशी, गोगावलेवाडीचाही सन्‍मान

सन २०२३-२४ च्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम स्पर्धेत तीन ग्रामपंचायतींना गौरविण्यात येणार आहे. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत हजारमाची (ता. कऱ्हाड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत बेलोशी (ता. जावळी), शौचालय व्यवस्थापनासाठी आबासाहेब खेडकर पुरस्कार गोगावलेवाडी (ता. कोरेगाव) यांना मिळाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात पारंपरिक शिवजयंती उत्साहात
पुढील बातमी
महाबळेश्वर महापर्यटन धर्तीवर वाहतूक मार्गात बदल

संबंधित बातम्या