कराड : प्रेमसंबंधाच्या संशयावरून कासेगावच्या युवकाचे अपहरण करून त्यास मारहाण करण्यासाठी संशयितांनी वापरलेल्या दोन गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही गाड्या त्याच आहेत का ? याची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर केले जाणार आहे.
कासेगावहून कराडकडे येणार्या रहिमतुल्ला सलीम आतार (वय 27, रा. पोस्ट ऑफिससमोर, कासेगाव, ता. वाळवा, सांगली) या युवकाचे वाठारनजीक अपहरण करून त्यास मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर गंभीर जखमी रहिमतुल्ला याचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करत सुदाम मोहन पवार (वय 27), राकेश रामदास पाटील (वय 26), अमर सुरेश खोत (वय 27), विराज युवराज तोडकर (वय 26), उमेश रविंद्र पाटील (वय 28), विशाल हणमंत शिद (वय 23) आणि ऋषिकेश धनाजी तोडकर (वय 26, सर्व रा. कासेगाव, ता. वाळवा) या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
मारहाणीनंतर जखमी रहिमतुल्ला याला सायंकाळी पाचच्या सुमारास संशयितांनी घरी सोडले होते. त्यानंतर रहिमतुल्ला हा कासेगावमधील साई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. त्यांनी सर्व प्रकार पाहून पोलिसांकडे जाण्यास सांगितल्यानंतर रहिमतुल्ला कासेगाव पोलीस ठाण्यात गेला होता. त्यानंतर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तो कासेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला होता. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कृत्रिम श्वासोच्छवासासाठी अत्याधुनिक रूग्णवाहिका तेथील डॉक्टरांनी उपलब्ध करून देत त्याला उपचारासाठी शिफ्ट केले होते, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी संशयितांनी ज्या दोन गाड्यांचा वापर केला, त्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या गाड्याचा गुन्ह्यात वापरल्या आहेत का ? याची पडताळणी सुरू असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.